KKR vs LSG: लखनौ इन, कोलकाता आऊट! रोमहर्षक सामन्यात सुपर जायंट्सचा दोन धावांनी विजय
KKR vs LSG: क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि केएल राहुलची (KL Rahul) वादळी खेळी आणि मोहसिन खानच्या (Mohsin Khan) भेदक माऱ्यापुढं कोलकात्याचा (KKR) संघानं गुडघे टेकले.
![KKR vs LSG: लखनौ इन, कोलकाता आऊट! रोमहर्षक सामन्यात सुपर जायंट्सचा दोन धावांनी विजय KKR vs LSG, IPL 2022: Lucknow Super Giants won the Match By 2 Runs against Kolkata Knight Riders KKR vs LSG: लखनौ इन, कोलकाता आऊट! रोमहर्षक सामन्यात सुपर जायंट्सचा दोन धावांनी विजय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/18/410ce8bc62058651762124995500ab2a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
KKR vs LSG: क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि केएल राहुलची (KL Rahul) वादळी खेळी आणि मोहसिन खान (Mohsin Khan) आणि मार्कस स्टॉयनिसच्या भेदक माऱ्यापुढं कोलकात्याचा (KKR) संघानं गुडघे टेकले. प्रथम फलंदाजी करत लखनौच्या संघानं कोलकात्यासमोर 20 षटकात एकही विकेट गमावता कोलकात्यासमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत कोलकात्याच्या संघाला 208 धावांवर रोखलं. अखेरच्या षटकात कोलकात्याच्या संघाला 21 धावांची गरज असताना मार्कस स्टॉयनिसनं उत्कृष्ट गोलंदाजी केली. लखनौच्या संघानं हा सामना फक्त दोन धावांनी जिंकला.
लखनौनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याच्या संघाची सुरुवात खराब झाली. कोलकात्याची सलामीवीर व्यंकटेश अय्यर (0 धाव) आणि अभिजीत टोमर (4 धावा) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर नितीश राणा आणि कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरनं संघाचा डाव सावरला. परंतु, सातव्या षटकातील पहिल्या चेंडवर मार्कस स्टॉयनिसनं नितीश राणाला (42 धावा) बाद केलं. त्यानंतर श्रेयस अय्यरही बाद झाला. त्यानं 36 चेंडूत 50 धावांची खेळी केली. कोलकात्याची चौथी विकेट्स पडल्यानंतर मैदानात आलेल्या सॅम बिलिंग्सनं आणि आंद्रे रसल संघाला विजय मिळवून देतील, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, हे दोघेही अपयशी ठरले. या सामन्यात सॅम बिलिंग्सनं 24 चेंडूत 36 आणि रसलनं 11 चेंडू खेळून फक्त पाच धावा केल्या. दरम्यान, अखेरच्या षटकात कोलकात्या विजयासाठी 21 धावांची गरज असताना रिंकू सिंहनं आक्रमक फलंदाजी केली. अखेरच्या षटकातील पहिल्या चार चेंडूत त्यानं 18 धावा कुटल्या. परंतु, दोन चेंडूत तीन धावांची आवश्यकता असताना तो बाद झाला. त्यानंतर अखेरच्या चेंडूत तीन धावांची गरज असताना मार्कस स्टॉयनिसनं कुलदीप यादवला बाद केलं. लखनौकडून मोहसीन खान आणि मार्कस स्टॉयनिसनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.
कोलकात्याविरुद्ध सामन्यात लखनौच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलनं घेतलेला निर्णय लखौनच्या बाजूनं योग्य ठरल्याचं दिसतंय. लखनौकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या क्विंटन डी कॉक आणि केएल राहुलं तुफानी फलंदाजी करत संघाचा डाव 210 वर नेला. या सामन्यात क्विंटन डी कॉकनं 70 चेंडूत नाबाद 140 धावा केल्या. तर, केएल राहुलनं 51 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. या खेळीसह दोन्ही खेळाडूंनी अनेक विक्रमाला गवसणी घातली. कोलकात्यासाठी टीम साऊथी सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. त्यानं चार षटकात 14.20 च्या सरासरीनं 57 धावा दिल्या आहेत.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)