कोलकात्याविरोधात रवींद्र जाडेजानं केले खास शतक, विराट-रोहितच्या पंक्तीत मिळवलं स्थान
CSK vs KKR : कोलकात्याचा पराभव करत चेन्नईची गाडी पुन्हा एकदा विजयाच्या पटरीवर परतली आहे. चेन्नईने कोलकात्याचा सात विकेटनं पराभव केला
CSK vs KKR : कोलकात्याचा पराभव करत चेन्नईची गाडी पुन्हा एकदा विजयाच्या पटरीवर परतली आहे. चेन्नईने कोलकात्याचा सात विकेटनं पराभव केला. या विजयामध्ये रवींद्र जाडेजा याचा सिंहाचा वाटा राहिला. कोलकात्याला 137 धावांवर रोखण्यात जाडेजानं महत्वाची भूमिका बजावली. जाडेजानं गोलंदाजीसोबत फिल्डिंगमध्येही मोलाचं योगदान दिलं. जाडेजानं दोन झेल घेत मोठा विक्रम केला. आयपीएलमध्ये 100 झेल घेण्याचा विक्रम जाडेजाने केला आहे. असा विक्रम करणारा जाडेजा पाचवा खेळाडू ठरला.
आयपीएलमध्ये पाच जणांनी आतापर्यंत 100 झेल घेतले आहेत. रवींद्र जाडेजाने 231 सामन्यात झेलचं खास शतक पूर्ण केले आहे. याआधी विराट कोहली (110), सुरेश रैना (109), कायरन पोलार्ड (103) आणि रोहित शर्मा (100) यांनी आयपीएलमध्ये 100 झेल घेण्याचा विक्रम केला. कोलकाता आणि चेन्नई यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचक हर्षा भोगले यांनी जडेजाला या विक्रमाबद्दल विचारले. यावर उत्तर देताना जाडेजाने सांगितले की, 'मी झेलांची संख्या मोजत नाही.' रवींद्र जडेजा आयपीएलच्या एकाच सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत शिखर धवनही मागे नाही, ज्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 98 झेल घेतले आहेत, तोही लवकरच खास क्लबमध्ये सामील होईल.
आयपीएलमध्ये जड्डूच्या नावावर खास विक्रम -
रवींद्र जडेजा पहिल्या सत्रापासून म्हणजेच 2008 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आतापर्यंत 231 सामन्यांमध्ये फलंदाजी करताना 2,776 धावा केल्या आहेत. गोलंदाज म्हणून त्याने आतापर्यंत 156 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात 2000 हून अधिक धावा करणारा आणि 150 हून अधिक बळी घेणारा तो पहिला खेळाडू आहे. आयपीएलच्या इतिहासात जडेजा सर्वाधिक विकेट घेणारा 9वा खेळाडू आहे.
चेन्नईची गाडी विजयाच्या पटरीवर परतली -
कोलकात्याचा पराभव करत चेन्नईची (CSK) गाडी पुन्हा एकदा विजयाच्या पटरीवर परतली. कोलकात्यानं दिलेले 138 धावांचे आव्हान चेन्नईने (CSK vs KKR) सात विकेट राखून सहज पार केले. दुसरीकडे यंदाच्या हंगामात कोलकात्याचा पहिला पराभव झाला. कोलकात्यानं प्रथम फंलदाजी करताना 137 धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कोलकात्यानं दिलेले हे आव्हान चेन्नईने सहज पार केले. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं नाबाद अर्धशतक ठोकलं. धोनीने तीन चेंडूमध्ये एक धाव काढली.