IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधाऱ्याच्या नावाने असणारे मैदानावरील स्टँड काढून टाकण्याचे आदेश; आयपीएलदरम्यान कारवाई
IPL 2025 Mohammad Azharuddin Stand Removal: एकीकडे रोहित शर्माच्या नावाने स्टँड, तर दुसरीकडे मोठी कारवाई

IPL 2025 Mohammad Azharuddin Stand Removal: रोहित शर्मा याच्या कामगिरीचा सन्मान म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशननं मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला रोहित शर्माचं नाव दिलं जाणार आहे. आयपीएलदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. मात्र एकीकडे रोहित शर्माचं नाव वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला दिले जात असताना दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नावे असणारे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील स्टँड काढून टाकण्यात येणार आहे.
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला (HCA) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील स्टँडवरून मोहम्मद अझरुद्दीनचे नाव हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असोसिएशनचे नीतिमत्ता अधिकारी आणि लोकपाल न्यायमूर्ती व्ही. ईश्वरैया यांनी हा आदेश दिला. भविष्यात मोहम्मद अझरुद्दीनच्या नावाने कोणतेही तिकीट छापले जाणार नाही याची खात्री करण्यासही त्यांनी सांगितले. मोहम्मद अझरुद्दीनवर आरोप करणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट क्लबने दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला.
राजीव गांधी स्टेडियम हे आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे होम ग्राउंड आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना मोहम्मद अझरुद्दीनने स्वतःच्या फायद्यासाठी काम केल्याचा आरोप आहे. त्यामुळे एचसीएला उप्पल स्टेडियमवरील मोहम्मद अझरुद्दीन स्टँड काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. मोहम्मद अझरुद्दीनच्या स्टँडच्या जागी आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू 'व्हीव्हीएस लक्ष्मण पॅव्हेलियन' असणार आहे.
🚨 AZHARUDDIN STAND REMOVAL. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 20, 2025
- The HCA has been ordered to remove Mohammad Azharuddin's name from the North Pavilion stand at the Uppal Stadium. No tickets will be printed with the name of Azharuddin as well. (Cricbuzz). pic.twitter.com/khmZua1bbt
लॉर्ड्स क्रिकेट क्लबने मोहम्मद अझरुद्दीनचा निर्णय रद्द करण्याची मागणी लोकपालकडे केली होती. अझरुद्दीन यापूर्वी भारताचा कर्णधार आणि एचसीएचा अध्यक्ष होता. त्यांनी आपल्या पदाचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी केल्याचा आरोप आहे. मोहम्मद अझरुद्दीनने आपल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन स्वतःचा फायदा करून घेतला असेही न्यायालयाच्या 25 पानांच्या निर्णयात म्हटले. अझरुद्दीनचा निर्णय बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. जनरल बॉडी किंवा अॅपेक्स काऊंसिलने 'मोहम्मद अझरुद्दीन स्टँड' हे नाव मंजूर केले नव्हते, अशी माहितीही समोर आली आहे.





















