(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका यांनी केएल राहुलची घेतली भेट; संघात कायम ठेवणार?; मोठी माहिती समोर
IPL Lucknow Super Giants KL Rahul: संजीव गोएंका आणि केएल राहुल यांच्या या भेटीत आगामी आयपीएलच्या हंगामाबाबत चर्चा झाल्याचं समोर येत आहे.
IPL Lucknow Super Giants KL Rahul: आयपीएल लिलावापूर्वी संघ कोणते खेळाडू कायम ठेवतील? याबाबत सातत्याने चर्चा रंगत आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका यांनी कर्णधार केएल राहुलची भेट घेतली. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की लखनऊ सुपरजायंट्स कोणत्याही परिस्थितीत केएल राहुलला कायम ठेवू इच्छित आहेत. या भेटीत राहुलला संघात कायम ठेवण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
आयपीएल 2024 दरम्यान सोशल मीडियावर लखनौ सुपर जायंट्सचे (Lucknow Super Giants) मालक संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल (KL Rahul) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये संजीव गोएंका केएल राहुलवर रागवल्याचं व्हिडीओमधून दिसत होतं. यानंतर संजीव गोएंका आणि केएल राहुल यांच्यात काही आलबेल नसल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे केएल राहुल लखनौ संघाला रामराम ठोकणार अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे संजीव गोएंका आणि केएल राहुल यांच्या या भेटीत आगामी आयपीएलच्या हंगामाबाबत चर्चा झाल्याचं समोर येत आहे.
केएल राहुल टी-20 फॉरमॅटशी जुळवून घेण्यास अपयशी-
आयपीएलमधील केएल राहुलच्या स्ट्राईक रेटवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केएल राहुल टी-20 फॉरमॅटशी जुळवून घेण्यास अपयशी ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु व्यतिरिक्त केएल राहुल आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सचा भाग आहे.
रोहितसह 4 प्रमुख खेळाडूंना डच्चू?
आयपीएल 2024 मध्ये (IPL 2025) हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले होते. रोहित शर्माला (Rohit Sharma) हटवून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्यात आले. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माच्या हातून सोडून हार्दिकच्या हाती गेले. गेल्या हंगामातही रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापन यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याचा अंदाज लावला जात होता. आता केवळ रोहितच नाही तर हार्दिक पांड्यालाही संघातून वगळले जाऊ शकते अशी बातमी आहे. त्यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज टीम डेव्हिड यांनाही संघातून रिलीज केले जाण्याची शक्यता आहे.
IPL 2025 च्या मेगा लिलावात नवीन नियम?
2022 मध्ये झालेल्या मेगा लिलावावर नजर टाकल्यास एकूण 204 खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. या 204 खेळाडूंची एकूण किंमत 551 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. आयपीएल तसेच क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे 2025 च्या मेगा लिलावात खेळाडूंची संख्या आणखी वाढू शकते. मिळालेल्या माहितीनूसार प्रत्येक संघाला 3 ते 4 खेळाडू ठेवण्याची परवानगी असेल. फ्रँचायझी जास्तीत जास्त 25 खेळाडू खरेदी करू शकते, त्यापैकी 8 परदेशी खेळाडू आहेत, परंतु एक संघ या 8 परदेशी खेळाडूंपैकी केवळ 4 खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देतो. टी-20 विश्वचषक 2024 च्या यशस्वी आयोजनानंतर, हे देखील शक्य आहे की अमेरिकेसह इतर अनेक देशांचे खेळाडू देखील लिलावात आपला दावा करू शकतात.