IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं
IPL 2024 : आयपीएल 2024 चा चषक आरसीबी जिंकू शकते, त्याची तीन महत्वाची कारणे आहेत. 17 वर्षांचं स्वप्न यंदा पूर्ण होणार असल्याच्या चर्चा आरसीबीच्या चाहत्यांमध्ये सुरु आहेत.
IPL 2024 : नाही नाही म्हणत, आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. आयपीएल 2024 च्या पहिल्या टप्प्यातील सामन्यानंतर आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचणार नाही, असे सर्वांनीच भाकीत केले होते. पण आरसीबी खेळाडू आणि चाहत्यांना विश्वास होता. आरसीबीने दुसऱ्या टप्प्यात आपला खेळ उंचावला. फक्त एक टक्क्यांची संधी त्यांनी 100 टक्के करुन दाखवली. आरसीबीच्या कमबॅकची स्टेरी एखाद्या प्रेरणादायक चित्रपटाप्रमाणेच आहे. कुणालाच आरसीबीवर विश्वास नव्हता, पण त्यांनी सर्वांना फेल ठरवत आपलं भविष्य स्वत: लिहिले. दुसऱ्या टप्प्यात लागोपाठ सहा सामन्यात विजय मिळवत प्लेऑफचं तिकिट मिळवले.
आरसीबी पहिल्या टप्प्यात गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर होती. आठ सामन्यातील सात सामने गमावले होते. पण दुसऱ्या टप्प्यात त्यांनी शानदार कमबॅक केले. लागोपाठ सहा सामन्यात मोठा विजय मिळवत प्लेऑफमधील स्थान निश्चित केले. आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासातील हे सर्वात मोठं कमबॅक ठरले. मोक्याच्या सामन्यात आरसीबीने बलाढ्या आणि पाच वेळच्या विजेत्या चेन्नईचा 27 धावांनी धुराळा उडवला अन् प्लेऑफचं तिकिट मिळवले. आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारवार उरला नाही. आरसीबीला आता रोखणं कठीण असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. चाहत्यांसोबतच समालोचकांनीही आरसीबी यंदा चषकावर नाव कोरेल, असा अंदाज वर्तवला. पण त्याची कारणे काय असू शकतात, हे पाहूयात..
विजयाची लय, खंबीर मानसिकता -
साखळी सामन्यातील पहिल्या आठ पैकी फक्त एक विजय मिळवला होता, पण शेवट झाला तेव्हा आरसीबीने सात विजय मिळवत प्लेऑफचं तिकिट मिळवलं होतं. प्लेऑफच्या सामन्याआधी फाफ डू प्लेसिसच्या आरसीबीकडे शानदार विजयाची लय आहे. एलिमेनटरमध्ये आरसीबीचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत होत आहे. राजस्थानला लागोपाठ पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. मे महिन्यात राजस्थानला एकही विजय मिळवता आला नाही, तर आरसीबीने एकही सामना गमावला नाही. आरसीबीकडे विजयाची लय आहे, खेळाडूही लयीत आहेत. राजस्थानविरोधात आरसीबीचा विजय निश्चित मानला जातोय. खेळाडूंची मानसिक स्थिती चांगली आहे, त्यामुळे क्वालिफायर 2 आणि फायनलमध्ये आरसीबीसाठी कोणतेही लक्ष्य अशक्य नाही.
आरसीबीचे फलंदाज लयीत -
साखळी सामन्याच्या पहिल्या टप्प्यात आरसीबीसाठी फक्त विराट कोहलीच धावा करत होता. पण फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरॉन ग्रीनसह अनेक दिग्गज खेळाडूंना धावा काढता येत नव्हत्या. पण मागील सहा सामन्यात आरसीबीच्या सर्वच खेळाडूंच्या बॅटमधून धावा निघू लागल्या. विराट कोहलीने मागील सहा सामन्यात 65.8 च्या सरासरीने 329 धावा केल्या. फाफ डू प्लेसिस याने मागील सहा सामन्यात दोन अर्धशतकासह धावांचा पाऊस पाडलाय. कर्णधार फाफ डू प्लेसिस याने CSK विराधात 54 धावांची खेळी केली. त्याशिवाय कॅमरुन ग्रीन आणि दिनेश कार्तिक यांनीही धावांचा पाऊस पाडलाय. रजत पाटीदार याने मधल्या षटकात धावांचा पाऊस पाडलाय. रजत पाटीदारने फिरकी गोलंदाजांची दाणादाण उडवली.
एमए चिदंबरम स्टेडियममध्ये शानदार रेकॉर्ड
IPL 2024 चा फायनल सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईमधील स्टेडियममध्ये आरसीबीच्या मागील चार सामन्यांचा रेकॉर्ड चांगला राहिला. चार सामन्यापैकी तीन सामन्यात आरसीबीने विजय मिळवलाय. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीला आधी एलिमिनेटर आणि त्यानंतर क्वालिफायर 2 चे खडतर आव्हान पार करावे लागेल.