Yashasvi Jaiswal : लेट पण थेट, मराठमोळ्या यशस्वी जयस्वालच्या शतकाचं जयपूरमध्ये वादळ, मुंबईच्या बॉलर्सची धुळदाण
IPL 2024 : यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. मुंबई इंडियन्स विरुद्ध त्यानं दमदार शतकी खेळी केली.
जयपूर:राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात यंदाच्या आयपीएलमधील 38 वी मॅच पार पडली. राजस्थान रॉयल्सनं आजपर्यंत ठेवलेला विश्वास यशस्वी जयस्वालनं सार्थ ठरवला. यंदाच्या आयपीएलमध्ये यशस्वी जयस्वालला यापूर्वीच्या मॅचमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. मराठमोळ्या यशस्वी जयस्वालनं जोरदार फटकेबाजी केली आणि संघाला विजयाजवळ पोहोचवलं. यशस्वी जयस्वालला जोस बटलर आणि संजू सॅमसननं साथ दिली. यशस्वी जयस्वालनं 59 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. यशस्वी जयस्वालनं गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये देखील शतक केलं होतं. यशस्वी जयस्वालनं 104 धावांची खेळी करत राजस्थानला विजय मिळवून दिला.
यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरनं यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी डावाची सुरुवात केली आहे. राजस्थान रॉयल्सकडून यापूर्वीच्या मॅचमध्ये यशस्वी जयस्वालला अपेक्षित अशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र, मुंबई इंडियन्स विरुद्ध यशस्वी जयस्वालला सूर गवसला आहे. यशस्वी जयस्वालनं मुंबईच्या वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना जोरदार फटके मारले. यशस्वी जयस्वालनं मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सना 7 सिक्स आणि 9चौकार मारले. यशस्वी जयस्वालनं 60 बॉलमध्ये 104 धावा केल्या.
जोस बटलरची यशस्वी जयस्वालला साथ
जोस बटलरनं यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सला दोन शतकं झळकावत विजय मिळवून दिलेला आहे. जोस बटलरनं आज आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या यशस्वी जयस्वालला साध दिली. त्यानं सहा चौकारांच्या जोरावर 35 धावा करुन एक बाजू सांभाळून ठेवली. मात्र, पियुष चावलाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरनं 74 धावांची सलामीची भागिदारी केली.
यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसनची दमदार शतकी भागिदारी
यशस्वी जयस्वालनं 31 धावांमध्ये अर्धशतक झळकावलं. राजस्थान रॉयल्ससाठी त्यानं यंदाच्या आयपीएलमधील पहिलं अर्धशतक झळकावलं. यशस्वी जयस्वालनं 2023 च्या आयपीएलमध्ये देखील शतक झळकावलं होतं. कॅप्टनं संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वालनं शतकी भागिदारी करत राजस्थानला विजयाजवळ पोहोचवलं. राजस्थान रॉयल्सनं या विजयासह गुणतालिकेत पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. संजू सॅमसननं 38 धावा केल्या.
दरम्यान, यशस्वी जयस्वालनं मुंबई इंडियन्स विरुद्ध शतक झळकावत आगामी टी -20 वर्ल्डकपसाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. राजस्थानकडून या हंगामात जोस बटलरनं दोन तर यशस्वी जयस्वालननं एक शतक झळकावलं आहे.
संबंधित बातम्या