CSK vs RCB : चेन्नई विरुद्ध बंगळुरु लढतीनं आयपीएलची सुरुवात, मुंबईच्या पथ्यावर पडणार? यापूर्वी काय घडलेलं?
RCB vs CSK : आयपीएलचं 17 वं पर्व बंगळुरु विरुद्ध चेन्नई यांच्यातील लढतीनं सुरु होत आहे. 2019 च्या आयपीएलमध्ये देखील चेन्नई आणि बंगळुरु यांच्यात पहिली मॅच झालेली तेव्हा मुंबईनं विजेतेपद पटकावलं होतं.
चेन्नई : आयपीएलचं (IPL 2024) 17 पर्व सुरु होण्यास काही तासांचा वेळ शिल्लक आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जपुढं (Chennai Super Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं (Royal Challengers Bengaluru) आव्हान आहे. चेन्नईचं नेतृत्त्व आता मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्याकडे तर बंगळुरुचं नेतृत्त्व फाफ डु प्लेसिस करत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीनं आयपीएलची सुरुवात होणं हे मुंबई इंडियन्ससाठी चांगले संकेत मानले जात आहेत.
चेन्नई आणि बंगळुरु यांच्यात यापूर्वी सलामीची लढत कधी?
2019 च्या आयपीएलची सुरुवात 2018 च्या आयपीएलची विजेती टीम चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाली होती. चेन्नईनं 2019 च्या आयपीएलच्या पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्सचा 7 विकेटनं धुव्वा उडवला होता. चेन्नईच्या बॉलर्सपुढं आरसीबीची टीम 18 ओव्हर्समध्ये 70 धावांवर बाद झाली होती. यानंतर चेन्नईनं 18 ओव्हर्समध्ये 3 विकेट गमावून 71 धावा केल्या होत्या. चेन्नईनं 2019 च्या आयपीएलची सुरुवात विजयानं केली होती.
चेन्नईची अंतिम फेरीत धडक मात्र मुंबईकडून पराभव
आयपीएलच्या 2019 च्या हंगामात अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत झाली होती. त्या लढतीत मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 विकेटवर 149 धावा केल्या होत्या. मुंबईनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला 20 ओव्हर्समध्ये 7 विकेटवर 148 धावा करता आल्या होत्या. मुंबईनं एका रननं आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.
चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी यांच्यात लढत
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्ज आणि फाफ डु प्लेसिस याच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील मॅचनं 2024 च्या आयपीएलच्या हंगामाची सुरुवात होत आहे. चेन्नईनं आतापर्यंत आयपीएलमध्ये पाचवेळा विजेतेपद पटकावलेलं आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. चेन्नईला पाचवेळा आयपीएल ट्रॉफी मिळवून देणारा महेंद्रसिंह धोनी कप्तानपदाच्या भूमिकेत नसेल. दुसरीकडे आरसीबीमध्ये देखील विराट कोहली कप्तान नाही. चेन्नई आणि आरसीबीच्या टीममधील धोनी आणि विराट कोहली हे दिग्गज खेळाडू कोणत्याही दडपणाशिवाय खेळताना दिसतील.
महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईला यापूर्वी 2010,2011,2018,2021 आणि 2023 मध्ये विजेतेपद मिळवून दिलं होतं. धोनी आता चेन्नईच्या टीममध्ये नव्या जबाबदारीसह मैदानात उतरेल. 2022 मध्ये देखील चेन्नईनं धोनी ऐवजी रवींद्र जडेजाकडे कप्तानपद सोपवून पाहिलं होतं. मात्र, त्या आयपीएलमध्ये चेन्नईची कामगिरी ढासळली होती. आता यंदाच्या आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाडकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. धोनीचा वारसा सक्षमपणे चालवण्यात ऋतुराज गायकवाड यशस्वी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या :