निकोलस पूरनचं वादळ, लखनौचं मुंबईसमोर 215 धावांचे विराट आव्हान
IPL 2024 MI vs LSG : निकोलस पूरनच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात 214 धावांचा डोंगर उभारलाय. पूरन याने 75 तर केएल राहुल याने 55 धावांची खेळी केली.
IPL 2024 MI vs LSG : निकोलस पूरनच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात 214 धावांचा डोंगर उभारलाय. पूरन याने 75 तर केएल राहुल याने 55 धावांची खेळी केली. मुंबईकडून पियुष चावला आणि नुवान तुषार यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. मुंबईला अखेरचा साखळी सामना जिंकण्यासाठी 215 धावांचे आव्हान असेल.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरच्या सामन्यात मुंबईने जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा आणि टीम डेविड यांना आराम दिला. अर्जुन तेंडुलकर आणि डेवाल्ड ब्रेविस यांना संधी देण्यात आली. वानखेडेच्या मैदानावर मुंबईकडून शानदार सुरुवात करण्यात आली. नुवान तुषाराने पहिल्याच षटकात देवदत्त पडीक्कल याला शून्यावर तंबूत धाडले. पण त्यानंतर केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिस यांनी लखनौच्या डावाला आकार दिला.
राहुलची संथ फलंदाजी
केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिस यांनी संयमी फलंदाजी करत लखनौच्या डावाला आकार दिला. दुसऱ्या विकेटसाठी 48 धावांची शानदार भागिदारी झाली, पण चावलाने ही जोडी फोडत मुंबईला दुसरं यश मिळवून दिले. मार्कस स्टॉयनिस 22 चेंडूत 28 धावा काढून बाद झाला. या खेळीमध्ये त्याने पाच चौकार ठोकले. स्टॉयनिसनंतर दीपक हुड्डानेही लगेच विकेट फेकली. हुड्डा फक्त 11 धावा काढून चावलाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत नऊ चेंडूमद्ये एक चौकार ठोकला. 69 धावांत लखनौचे तीन फलंदाज बाद झाले. पण त्यानंतर निकोलस पूरनचे वादळ आले.
पूरनचे वादळ
निकोलस पूरन आणि केएल राहुल यांनी लखनौसाठी शानदार भागिदारी केली. दोघांमध्ये शतकी भागिदारी झाली. केएल राहुल यानं संयमी फलंदाजी केली, तर दुसऱ्या बाजूला निकोलस पूरन याने वादळी फलंदाजी केली. निकोलस पूरन याने मुंबईच्या गोलंदाजांची धुलदाण उडवली. निकोलस पूरन याने29 चेंडूत 75 धावांचा पाऊस पाडला. पूरन याने आपल्या वादळी खेळीमद्ये आठ षटकार आणि पाच चौकार ठोकले. निकोलस पूरन याने 258 च्या स्ट्राईक रेटने मुंबईच्या गोलंदाजांना धुतले.
निकोलस पूरन याचे वादळ नुवान तुषारा याने शांत केले, पण तो बाद झाल्यानंतर लखनौची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. ठरावीक अंतराने एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. केएल राहुल 55 धावा काढून मोक्याच्या क्षणी बाद झाला. अर्शद खान याला खातेही उघडता आले नाही. केएल राहुल याने 41 चेंडूमध्ये 55 धावांची खेली केली. यामध्ये तीन षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता.
बडोनीचा फिनिशिंग टच
आयुष बडोनी आणि कृणाल पांड्या यांनी अखेरच्या दोन षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडला. दोघांच्या वादळी फलंदाजीमुळे लखनौची धावसंख्या 200 पार केला. बडोनी याने 10 चेंडूत 22 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. तर पांड्याने 12 धावांची खेळी केली.
चावलाचा भेदक मारा
मुंबईकडून पियुष चावला आणि नुवान तुषारा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. दोघांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. इतर गोलंदाजांच्या विकेटची पाटी कोरीच राहिली.