MI vs CSK 1st Innings Highlight : फिरकीच्या जाळ्यात अडकली मुंबई, चेन्नईला विजयासाठी 158 धावांचे आव्हान
MI vs CSK : रविंद्र जाडेजा आणि मिचेल सँटनर यांच्या फिरकीपुढे मुंबईच्या संघाची दाणादाण उडाली.

MI vs CSK 1st Innings Highlight : रविंद्र जाडेजा आणि मिचेल सँटनर यांच्या फिरकीपुढे मुंबईच्या संघाची दाणादाण उडाली. वानखेडे मैदानावर प्रथम फंलदाजी करताना मुंबईने निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 157 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. चेन्नईकडून रविंद्र जाडेजा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. चेन्नईला विजयासाठी 158 धावांची गरज आहे.
रोहित-ईशानची विस्फोटक सुरुवात -
कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी मुंबईला विस्फोटक सुरुवात करुन दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पाडला. 4 षटकात 38 धावांची सलामी दिली. पण रोहित शर्मा 21 धावांवर बाद झाल्यानंतर मुंबईची फलंदाजी ढासळली. रोहित शर्माने 13 चेंडूत एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 21 धावा केल्या. तर ईशान किशन याने 21 चेंडूत 32 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार लगावले. ईशान आणि रोहित शर्मा यांना चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मोठी खेळी करता आली नाही. विस्फोटक सुरुवात मिळाली पण त्याचे रुपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही.
मुंबईची फलंदाजी ढासळली -
रोहित शर्मा आणि ईशान किशन तंबूत परतल्यानंतर मुंबईचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कॅमरुन ग्रीन याने 11 चेंडूत फक्त 12 धावा केल्या. सूर्यकुमार यादव याने दोन चेंडूत एक धाव केली. अरशद खान 2 आणि ट्रिस्टन स्टब्स 10 चेंडूत 5 धावा काढून बाद झाला. चेन्नईच्या गोलंदाजीसमोर मुंबईच्या फलंदाजांनी नांगी टाकली.
तिलक वर्माला चांगली सुरुवात -
पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या तिलक वर्माला दुसऱ्या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली होती. तिलक वर्मावर पुन्हा एकदा मुंबईच्या फलंदाजीची धुरा आली होती. पण त्याला आज अपयश आले. तिलक वर्माने 18 चेंडूत 1 षटकार आणि दोन चौकाराच्या मदतीने 22 धावांची खेळी केली. तिलक वर्माला चांगली सुरुवात मिळाली होती, पण मोठी खेळी करता आली नाही.
टिम डेविडचे शर्तीचे प्रयत्न -
विस्फोटक फंलदाज टिम डेविड याने धावसंख्या वाढवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. आघाडीचे सर्व फलंदाज बाद झाल्यानंतर टिम डेविड याने मोर्चा संभाळला पण त्याला अखेरपर्यंत खेळता आले नाही. टिम डेविड याने 22 चेंडूत 31 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला.
रविंद्र जाडेजा-मिचेल सँटनरची जबरदस्त फिरकी -
रविंद्र जाडेजा आणि मिचेल सँटनर या फिरकीजोडीने भेदक मारा केला. या जोडीने मुंबईचा अर्धा संघ तंबूत पाठवला. रविद्र जाडेजाने तीन विकेट घेतल्या तर सँटरनने दोन जणांना तंबूचा रस्ता दाखवला. रविंद्र जाडेजाने चार षटकात अवघ्या 20 धावा खर्च करत तीन विकेट घेतल्या तर सँटरने चार षटकात 28 धावा खर्च केल्या. जाडेजाने ईशान किशन, कॅमरुन ग्रीन आणि तिलक वर्मा यांची शिकार केली. तर सँटरने सूर्यकुमार आणि अरशद खान यांना तंबूत धाडले. पदार्पण करणाऱ्या मगाला याला एक विकेट मिळाली. तर तुषार देशपांडे याने दोन विकेट घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
