SRH vs MI, Match Highlights: प्लेऑफसाठी मुंबईला 'ग्रीन' सिग्नल, हैदराबादचा आठ विकेटने पराभव
IPL 2023, SRH vs MI: कॅमरुन ग्रीनचे वादळी शतक आणि कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने हैदराबादचा आठ विकेटने पराभव केला.
IPL 2023, SRH vs MI: कॅमरुन ग्रीनचे वादळी शतक आणि कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने हैदराबादचा आठ विकेटने पराभव केला. हैदराबादने दिलेले 201 धावांचे आव्हान मुंबईने 12 चेंडू आणि 8 विकेट राखून सहज पार केले. या विजयामुळे मुंबईचे 16 गुण झाले आहेत.. मुंबईने गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्सने प्लेऑफच्या दिशेने आगेकूच केली आहे. आता आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामन्यानंतर प्लेऑफचे गणित स्पष्ट होईल.
मुंबई प्लेऑफमध्ये पोहचणार का ?
हैदराबादचा पराभव करत मुंबईने प्लेऑफच्या दिशेने आगेकूच केली आहे. आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामन्यावर मुंबईचे प्लेऑफचे गणित अवलंबून आहे. बेंगलोरमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे नाणेफेकी उशीराने होणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर मुंबई प्लेऑफमध्ये पोहचेल. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी गुजरातने सामना जिंकावा लागेल.. अथवा पावसाने हजेरी लावावी लागेल.
कॅमरुनचे वादळ -
201 धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. सलामी फलंदाज इशान किशन अवघ्या 14 धावांवर बाद झाला. भुवनेश्वर कुमार याने इशानचा डाव संपुष्टात आणला. कर्णधार रोहित शर्मा आणि कॅमरुन ग्रीन यांनी वादळी फलंदाजी केली. या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 128 धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा याने 37 चेंडूत 56 धावांची खेळी केली. या खेळीत रोहित शर्मा याने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. कर्णधार बाद झाल्यानंतर कॅमरुन ग्रीन याने डावाची सुत्रे हातात घेतली. कॅमरुन ग्रीन याने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेताल. ग्रीन याने 47 चेंडूत शतक झळकावले. या खेळीत त्याने आठ षटकार आणि आठ चौकार लगावले. कॅमरुन ग्रीन याने नाबाद 100 धावांची खेळी केली. सूर्युकमार यादव याने नाबाद 25 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने चार चौकार लगावले.
विवरांत शर्मा आणि मयांक अग्रवाल यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर हैदराबादने निर्धारित 20 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात 200 धावांपर्यंत मजल मारता आली. विवरांत शर्मा 69 तर मयांक अग्रवाल याने 83 धावांची खेळी केली. मुंबईकडून आकाश मधवाल याने चार विकेट घेतल्या.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने वादळी सुरुवात केली. मयांक अग्रवाल आणि विवरांत शर्मा यांनी हैदराबादला दमदार सुरुवात करुन दिली. हैदराबादच्या सलामी जोडीपुढे मुंबईची गोलंदाजी दुबळी अन् कमकुवत जाणवत होती. या जोडीने 140 धावांची सलामी दिली. विवरांत शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता. पावरप्लेमध्ये या दोघांनी 53 धावा जोडल्या. विवरांत आणि मयांक यांनी पहिल्या विकेटसाठी 83 चेंडूत 140 धावांची भागिदारी केली. यंदाच्या हंगामातील हैदराबादकडून ही सर्वोत्तम सलामी भागिदारी होय.. हैदराबादने यंदाच्या हंगामातील 14 सामन्यात 9 वेगवेगळ्या सलामी जोडीचा वापर केला.
विवरांत शर्मा आणि मयांक अग्रवाल यांची वादळी फलंदाजी
विवरांत शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक रुप धारण केले. दोघांनी मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेतला. बेहरनड्रॉफ असो किंवा आकाश मधवाल सर्वांचाच समाचार घेतला. विवरांत शर्मा याने 47 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या खेळीत विवरांत शर्मा याने दोन षटकार आणि 9 चौकार लगावले. विवरांत शर्मा याने 147 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. मयांक अग्रवाल याने 46 चेंडूत 83 धावांचे योगदान दिले. या खेळीत अग्रवाल याने चार षटकार आणि 8 चौकार लगावले. अग्रवाल याने 181 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. अग्रवाल याने क्लासेन याच्यासोबत 17 चेंडूत 34 धावांची भागिदारी केली.
सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर हैदराबादची फलंदाजी ढेसाळली... विवरांत आणि मयांक खेळत असताना हैदराबादचा संघ 230 धावसंख्या गाठेल असे वाटले होते.. पण सलामीची जोडी बाद झाल्यानंतर ये रे मागल्या प्रमाणे हैदराबादच्या फलंदाजांनी विकेट फेकल्या. क्लासेन याने 13 चेंडूत 18 धावांचे योगदान दिले. ग्लेन फिलिप्स एका धावेवर बाद झाला. तर हॅरी ब्रूक याला खातेही उघडता आले नाही. हैदराबादने एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या.. त्यामुळे मोठी धावसंक्या उभारता आली नाही. अखेरच्या षटकात हैदराबादच्या फलंदाजांना चौकार अथवा षटकार मारता आले नाहीत. आकाश मधवाल याच्या भेदक गोलंदाजीपुढे हैदराबादच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. मार्करमने सात चेंडूत नाबाद 13 धावांची खेळी केली.
आकाश मधवालचा भेदक मारा -
मुंबईकडून युवा आकाश मधवाल याने भेदक मारा केला. आकाश याने 4 षटकात 4 विकेट घेतल्या. यामध्ये दोन्ही सलामी फलंदाजांचा समावेश आहे. त्याशिवाय हेनरिक क्लासेन आणि हॅरी ब्रूक या दोन्ही विस्फोटक सलामी फलंदाजांचाही समावेश आहे. ख्रिस जॉर्डन याला एक विकेट मिळाली. या दोन गोलंदाजांचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही.