(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PBKS vs LSG, Match Highlights: लखनौचा पंजाबवर 56 धावांनी विराट विजय, मराठमोळा अथर्व एकटाच लढला
IPL 2023, PBKS vs LSG: लखनौच्या नवाबांनी पंजाबच्या किंग्सचा 56 धावांनी दारुण पराभव केला.
IPL 2023, PBKS vs LSG: लखनौच्या नवाबांनी पंजाबच्या किंग्सचा 56 धावांनी दारुण पराभव केला. लखनौने दिलेल्या 258 धावांच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने 201 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडून अथर्व तायडे याने एकाकी झुंज दिली. अथर्व तायडे याने अर्धशतक झळकावले. अथर्वचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी विकेट फेकल्या. लखनौकडून यश ठाकूर याने चार विकेट घेतल्यात. तर नवीन उल हक याने तीन फलंदाजांना तंबूत धाडले.
258 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शिखर धवन एका धावेवर तंबूत परतला. त्यानंतर प्रभसिमरनही 9 धावा काढून बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना दुसर्या बाजूला तायडे धावा कूटत होता. अथर्व तायडे आणि सिकंदर रजा यांनी पंजाबच्या विजयाच्या आशा वाढवल्या होत्या. पण अथर्व आणि सिकंदर रजा एकापाठोपाठ बाद झाले. अथर्व तायडे याने 66 धावांचे योगदान दिले. तर सिकंदर रजा याने 36 धावा केल्या. यामध्ये एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. लियाम लिव्हिंगस्टोन 23 धावांवर बाद झाला. तर सॅम करन याने 21 धावांचे योगदान दिले. जितेश शर्मा याने 10 चेंडूत 24 धावा चोपल्या. या खेळीत जितेश शर्मा याने तीन षटकार मारले. राहुल चहर आमि कगिसो रबाडा यांना खातेही उघडता आले नाही. अर्शदीप दोन धावांवर नाबाद राहिला.
अथर्व तायडे याने वादळी फलंदाजी केली. शिखर धवन तंबूत परतल्यानंतर अथर्व मैदानात आला होता. 258 धावांचा पाठलाग करताना पंजाबला मोठा धक्का बसला होता.. अथर्व याने वादळी खेळी करत पंजाबच्या धावसंख्येला आकार दिला. अथर्व तायडे याने 36 चेंडूत 66 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत अथर्व तायडे याने दोन षटकार आणि आठ चौकार लगावले. अथर्व याने पंजाबकडून सर्वाधिक धावसंख्या उभारली.
लखनौकडून यश ठाकूर याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याशिवाय नवीन उल हक याने तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. रवि बिश्नोई याने दोन खेळाडूंना बाद केले. मार्कस स्टॉयनिस याने एक विकेट घेतली.
( आणखी वाचा : महाराष्ट्राचा पठ्ठ्या पंजाबसाठी एकटाच लढला, लखनौच्या गोलंदाजांना धुतले )
दरम्यान, मार्कस स्टॉयनिस आणि काइल मेयर्स यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर लखनौने निर्धारित 20 षटकात 257 धावांचा डोंगर उभारला. लखनौच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोंदाजांचा समाचार घेतला. काइल मेयर्स याने 54, आयुष बडोनी याने 43, मार्कस स्टॉयनिस याने 72 तर निकोलस पूरन याने 45 धावांचे योगदान दिले. या फलंदाजांच्या बळावर लखनौने 257 धावांचा डोंगर उभारला. यंदाच्या आयपीएलमधील ही सर्वोच्च धावसंख्या होय. तर आयपीएलमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएलमध्ये आरसीबीची सर्वोच्च 263 धावसंख्या आहेत. लखनौचा संघ याबाबत दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय.
काइल मेयर्सचा झंझावात -
लखनौचा सलामी फलंदाज काइल मेयर्स याने आज वादळी खेळी केली. पहिल्या चेंडूपासूनच मेयर्स याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. मेयर्स याने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मेयर्स याने 24 चेंडूत 54 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये त्याने चार षटकार आणि सात चौकार लगावले. मेयर्स याने राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागिदारी केली. त आयुष बडोनीसोबत 33 धावांची भागिदारी केली.
मार्कस स्टॉयनिसचे वादळ -
आयुष बडोनी याची प्रभावी खेळी -
आयुष बडोनी याने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. बडोनी याने 24 चेंडूत 43 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि तीन चौकार लगावले. बडोनी याने स्टॉयनिससोबत लखनौच्या डावाला आकार दिला.
निकोलस पूरनचा फिनिशिंग टच -
मार्कस स्टॉयनिस बाद झाल्यानंतर निकोलस पूरन याने डावाची सुत्रे हातात घेतली. पूरन याने आधी निकोलस पूरन याच्यासोबत अवघ्यात 30 चंडूत 76 धावांची भागिदारी केली. यामध्ये पूरन याने 17 चेंडूत 44 धावांचे योगदान होते. निकोलस पूरन याने 19 चेंडूत 45 धावांची खेळी केली. यामध्ये पूर याने सात चौकार आणि एक षटकार लगावला.
दीपक हुड्डा याने सहा चेंडूत 11 धावांचे योगदान दिले. यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. तर कृणाल पांड्याने दोन चेंडूत पाच धावांचे योगदान दिले.
राहुलचा फ्लॉप शो -
लखनौचा कर्णधार केएल राहुल याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. राहुल पु्न्हा एकदा फेल गेलाय. राहुल याने 9 चेंडूत फक्त 12 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि एक चौकार लगावला. केएल राहुल आणि मेयर्स यांच्यात 41 धावांची सलामी झाली.
पंजाबची गोलंदाजी कशी ?
पंजाबच्या गोलंदाजांनी आज खराब कामगिरी केली. राहुल चहरचा अपवाद वगळता पंजाबच्या गोलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. राहुल चहर याने चार षटकात 29 धावा खर्च केल्या. राहुल चहर वगळता प्रत्येक गोलंदाजाने प्रतिषटक 10 पेक्षा जास्त धावा खर्च केल्या. गुरनूर याने तीन षटकात 42 धावा दिल्या. अर्शदीपने चार षटकात 54 धावा खर्च केल्या अन् एक विकेट घेतली. कगिसो रबाडा याने चार षटकात 52 धावा दिल्या. सिकंदर रजा याने एका षटकात 17 धावा दिल्या. सॅम करन याने तीन षटकात 38 धावा दिल्या. लियाम लिव्हिंगस्टोन याने एक षटकात 19 धावा खर्च केल्या. रबाडाला दोन विकेट मिळाल्या. तर अर्शदीप, सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.