ऋतुराजची फटकेबाजी अन् मोईनची फिरकी; चेन्नईचा लखनौवर 12 धावांनी विजय
CSK vs LSG, Match Highlights: चेन्नईने दिलेले 218 धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ संघाने 205 धावांपर्यंत मजल मारली.
CSK vs LSG, Match Highlights: अटतटीच्या लढतीत चेन्नईने लखनौचा 12 धावांनी पराभव केला. ऋतुराज गायकवाड याने अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर मोईन अली याने चार विकेट घेतल्या. चेन्नईने दिलेले 218 धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ संघाने 205 धावांपर्यंत मजल मारली. लखनौचा पराभव करत चेन्नईने आयपीएलच्या 16 व्या हंगमातील पहिला विजय नोंदवला.
काइल मेयर्सची तुफानी फटकेबाजी
लखनौचा सलमी फलंदाज काइल मेयर्स याने सलग दुसऱ्या सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. काइल याने पावरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडला. चेन्नईच्या सर्वच गोलंदाजाचा त्याने समाचार घेतला. मेयर्स याने अवघ्या 22 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि दोन षटकार लगावले. मेयर्स याने राहुलसोबत 33 चेंडूत 79 धावांची सलामी दिली.
राहुलचा पुन्हा फ्लॉप शो -
लखनौचा कर्णधार केएल राहुल याला दुसऱ्या सामन्यातही धावा जमवता आल्या नाहीत. पहिल्या विकेटसाठी मेयर्ससोबत 79 धावांची भागिदारी केली. पण यामध्ये मोठा वाटा मेयर्स याचाच होता. मेयर्स बाद झाल्यानंतर दीपक हुड्डानेही आपली विकेट फेकली. त्यानंतर राहुलही तंबूत परतला. राहुलने 18 चेंडूत फक्त 20 धावांची खेळी केली. या खेळीत राहुलला एकही षटकार लगावता आला नाही. दीपक हुड्डा यालाही धावगती वाढवता आली नाही. हुडा फक्त दोन धावा काढून बाद झाला. तर क्रृणाल पांड्या 9 धावा काढून तंबूत परतला. विस्फोटक स्टॉयनिस यालाही आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. स्टॉयनिस याने 18 चेंडूत 21 धावांचे योगदान दिलेय.
निकोलस पूरनची फटकेबाजी -
निकोलस पूरन याने धावांचा पाऊस पाडला. आपल्या छोटेखानी खेळीत चेन्नईच्या गोलंदाजांना घाम फोडला. पूरन याने 18 चेंडूत तीन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने पूरन याने 32 धावांची खेळी केली.
क्रृष्णप्पा गौतम अन् आयुष बडोनीचा प्रतिकार
आघाडीची फळी ढासळल्यानंतर क्रृष्णप्पा गौतम आणि आयुष बडोनी यांनी लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी लखौनाची विजयाकडे आगेकूच करण्याचा प्रयत्न केला. सातव्या विकेटसाठी दोघांनी 22 चेंडूत 39 धावांची भागिदारी केली. पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अखेरच्या षटकात विजयासाठी 28 धावांची गरज होती, तेव्हा बडोनी बाद झाला अन् लखनौच्या विजयाच्या आशा मावळल्या.
मोईन अलीचा जबरदस्त स्पेल, सँटरनची जबरदस्त साथ -
काइल मेयर्स आणि केएल राहुल यांनी विस्फोटक सुरुवात केली होती. लखनौच्या सलामी फलंदाजांनी पावरप्लेमध्ये प्रति षटक 14 धावा काढल्या होत्या. ही विस्फोटक खेळी मोईन अली याने संपवली. मोईन अली याने चार षटकात लखनौच्या विजयाच्या आशा संपवल्या. मोईन अली याने चार षटकात 26 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. मोईन अली याने लखनौच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. लखनौचा कर्णधार केएल राहुल, काइल मेयर्स, क्रृणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिस यांना बाद केले. मोईन अली याला मिचेल सँटरन याने चांगली साथ दिली. सँटनर याने चार षटकात 21 धावा खर्च करत एक विकेट घेतली. सँटरन आणि मोईन अली या जोडगोळीने लखौनाचा अर्धा संघ तंबूत धाडला.
दरम्यान, ऋतुराज गायकवाड आणि कॉनवे यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने 217 धावांचा डोंगर उभारला. चेन्नईकडून प्रत्येक फलंदाजाने धावांचा पाऊस पाडला. चेन्नईने सात विकेटच्या मोबदल्यात 217 धावा उभारल्या. डेवेन कॉनवे आणि ऋतुराज यांनी 110 धावांची सलामी दिली.
ऋतुराजचा धमाका, झळकावले सलग दुसरे अर्धशतक
मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक फलंदाजी करत सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड याने विस्फोटक फलंदाजी केली होती. गुजरातविरोधात ऋतुराजने 92 धावांचा पाऊस पाडला होता. त्यानंतर आज लखनौविरोधात त्याने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत ऋतुराज गायकवाड याने 4 षटकार आणि तीन चौकार लगावले. रवि बिश्नोईच्या गोलंदाजीवर ऋतुराजची खेळी संपुष्टात आली.
कॉनवेची फटकेबाजी -
नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईकडून कॉनवे आणि ऋतुराज सलामीसाठी मैदानात उतरले. दोघांनी चेन्नईला आक्रमक सुरुवात करुन दिली. ऋतुराज गायकवाड आणि कॉनवे यांनी मैदानाच्या चारीबाजून फटकेबाजी केली. ऋतुराज गायकवाड याने 31 चेंडूत 57 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत ऋतुराज गायकवाड याने 4 षटकार आणि तीन चौकार लगावले. रवि बिश्नोईच्या गोलंदाजीवर ऋतुराजची खेळी संपुष्टात आली. ऋतुराज गायकवाड याने कॉनवेसोबत 9 षटकात 110 धावांची सलामी दिली. कॉनवे आणि ऋतुराजसमोर लखनौची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. कॉनवे याने 47 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान कॉनवे याने 2 षटकार आणि पाच चौकार लगावले.
रायडू-मोईन-शिवम दुबेची प्रभावी खेळी
कॉनवे आणि ऋतुराज यांनी चेन्नईला दणक्यात सुरुवात करुन दिली होती. या दोघांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. त्यानंतर मोईन अली आणि शिवब दुबे यांनी धावांचा पाऊस पाडला. दोघांनी प्रभावी खेळी केली. मोईन अली याने 13 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले. तर शिमन दुबे याने 16 चेंडूत 27 धावांचे योगदान दिले. यामध्ये दुबे याने एक चौकार आणि तीन षटकार लगावले. शिवम दुबे याने 102 मीटरचा षटकार लगावला. अंबाती रायडूनेही धुवांधार फलंदाजी केली. रायडूने 14 चेंडूत 27 धावांचे योगदान दिलेय. या खेळीदरम्यान त्याने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले.
चौकार-षटकारांचा पाऊस -
चेन्नईच्या सर्वच फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. चेन्नईकडून 20 षटकात 13 षटकार लगावण्यात आले तर 15 चौकार लगावण्यात आले.
धोनीचा फिनिशिंग टच -
जाडेजा बाद झाल्यानंतर धोनीने मार्क वूड याला षटकार लगावले. धोनीने सलग दोन चेंडूवर दोन षटकार लगावले. धोनीने तीन चेंडूत 12 धावांची खेळी केली.
स्टोक्स पुन्हा फ्लॉफ
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. त्याला मोठी खेळी करता आली नाही. स्टोक्स फक्त 8 धावा काढून बाद झाला. गुजरातविरोधात झालेल्या सामन्यातही स्टोक्सला मोठी खेळी करता आली नव्हती. स्टोक्सला पहिल्या सामन्यात फक्त सात धावा करता आल्या. तर दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करता आली नाही. आज स्टोक्स गोलंदाजी करणार का? याबाबत चर्चा सुरु आहे. रविंद्र जाडेजालाही मोठी खेळी करता आली नाही. जाडेजाने सहा चेंडूत फक्त तीन धावा केल्या.
IPL 2023: LSG Ravi Bishnoi excellent bowling performance 3 crucial wickets against CSK
बिश्नोईची भेदक गोलंदाजी -
चेन्नईच्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक रुप धारण केले होते. लखनौच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेत होते. अशातच रवि बिश्नोई याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. बिश्नोई याने भेदक मारा करत चेन्नईच्या तीन फलंदाजांना बाद केले. बिश्नोईने 4 षटकात अवघ्या 28 धावा खर्च करत आघाडीच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. रवि बिश्नोई याने ऋतुराज गायकवाड, मोईन अली आणि शिवम दुबे यांना तंबूचा रस्ता दाखवला.
लखनौच्या गोलंदाजांची धुलाई -
रवि बिश्नोईचा अपवाद वगळता लखनौच्या इतर गोलंदाजांची धुलाई झाली. मार्क वूड, आवेश खान, क्रृणाल पांड्या, कृष्णप्पा गौतम, यश ठाकूर या सर्व गोलंदाजांची धुलाई झाली. आवेश खान याने एक विकेट घेतली. तर मार्क वूड याने तीन विकेट घेतल्या. पण चार षटकात 50 धावा खर्च केल्या.