Shashank Singh: पहिल्यांदाच फलंदाजीची संधी मिळाली अन् त्याच सामन्यात मोडला विराटचा रेकॉर्ड
IPL 2022: मुंबईच्या वानखेडे मैदानावर पार पडलेल्या आयपीएलच्या 40 व्या सामन्यात गुजरात टायन्सनं सनरायजर्स हैदराबादला पराभूत केलं.
IPL 2022: मुंबईच्या वानखेडे मैदानावर पार पडलेल्या आयपीएलच्या 40 व्या सामन्यात गुजरात टायन्सनं सनरायजर्स हैदराबादला पराभूत केलं. हैदराबादच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघानं पाच विकेट्स राखून हैदराबादचा धुव्वा उडवला. परंतु, सोशल मीडियावर गुजरातच्या विजयापेक्षा हैदराबादचा युवा फलंदाज शशांक सिंहच्या (Shashank Singh) फलंदाजीची चर्चा रंगली आहे. ज्यान अखेरच्या षटकात आक्रमक फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधलं. एवढेच नव्हे तर, पहिल्यांदाच संधी मिळालेल्या सामन्यात त्यानं विराट कोहलीचं रेकॉर्डही मोडलं आहे.
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच फलंदाजीची संधी मिळालेल्या शशांक सिंहनं पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तसेच 20 षटकात लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर तीन षटकार मारून हैदराबादच्या संघाचा स्कोर 195 वर पोहचवला. या सामन्यात त्यानं 416 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करत विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला आहे. विराट कोहलीनं 2019 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात 7 चेंडूत 26 धावा केल्या होत्या. त्यावेळी विराटचा स्टाईक रेट 357 इतका होता.
शशांकचा संघर्षमय प्रवास
शशांकनं 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सनं त्याला संघात सामील केलं. परंतु, दिल्लीच्या संघानं त्याला संधी न देता रिलीज केलं. त्यानंतर 2019 मध्ये राजस्थानच्या संघाला त्याला 30 लाखात विकत घेतलं. मात्र, राजस्थानकडूनही त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान, 2020 मध्ये राजस्थाननं त्याला संघात कायम ठेवलं. परंतु, तेव्हाही त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. आता 2022 मध्ये हैदराबादला त्याची योग्यता समजली. हैदराबादनं त्याला पदार्पणाची संधी दिली. म्हणजेच तीन वर्षांनी शशांकला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली.
शशांकची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
शशांकनं आतापर्यंत खेळलेल्या 37 टी-20 सामन्यांमध्ये 142.28 च्या स्ट्राइक रेटनं 424 धावा केल्या आहेत. त्याच्या षटकारांची तुलना महेंद्रसिंग धोनीशीही केली जात आहे. त्यानं टी-20 मध्ये आतापर्यंत 22 षटकार मारले आहेत. यासोबतच त्यानं टी-20 मध्ये 10 विकेट्सही घेतल्या आहेत. शशांकनं प्रथम श्रेणीमध्ये आतापर्यंत 9 सामन्यांत 436 धावा केल्या आहेत आणि 4 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं 23 लिस्ट ए सामन्यात 2 अर्धशतकांच्या मदतीनं 536 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-