(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli IPL Stats: आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट यंदा मात्र फ्लॉप, पाहा या मोसमात कोहलीची कामगिरी
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट कोहली यंदाच्या मोसमात मात्र फ्लॉप ठरला आहे. या मोसमात विराट कोहलीला कोणत्याही सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
Virat Kohli IPL Stats : आत्तापर्यंत आयपीएलमध्ये (Indian Premier League) सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा फलंदाज विराट कोहलीची ओळख आहे. मात्र, या मोसमात विराट कोहली आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. मंगळवारी लखनौविरुद्धच्या सामन्यात कोहलीला खातेही उघडता आले नाही. याआधीही त्याला या मोसमात कोणत्याही सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. एकेकाळी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा पाऊस पाडून सर्व विक्रम करणाऱ्या कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे.
या मोसमातील विराट कोहलीची कामगिरी
विराट कोहलीने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 7 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 19.83 च्या सरासरीने केवळ 119 धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याची सर्वोच्च धावसंख्या ही 48 राहिली आहे. या मोसमात कोलहलीने आत्तापर्यंत 9 चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. गेल्या मोसमात विराट कोहलीची बॅट चांगली तळपली होती. त्याने मागील मोसमात 15 सामन्यात 405 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने 2010 पासून गेल्या मोसमापर्यंत विराट कोहलीने चमकदार कामगिरी केली होती. दरम्यान त्याच्या फॉर्मची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
विराटची आत्तापर्यंतची आयपीएल कारकीर्द
आयपीएलमध्ये 200 हून अधिक सामने खेळलेल्या फलंदाजांपैकी विराट कोहली हा एक आहे. कोहलीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 214 आयपीएल सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने सर्वोत्तम सरासरीने 6 हजार 402 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत 6000 हून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. कोहलीने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 5 शतके आणि 42 अर्धशतके झळकावली आहेत. विराटने 555 चौकार आणि 212 षटकारही मारले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक दावा करणारा फलंदाज कधी फॉर्ममध्ये येमार याची चाहते वाट बघत आहेत.
विराट कोहलीसाठी आयपीएलचा हा पंधरावा हंगाम चांगला ठरला नाही. आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी विराट कोहलीनं आरसीबीच्या संघाचं कर्णधार पद सोडलं आणि आता तो फलंदाजीमध्येही संघर्ष करताना दिसत आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामन्यात विराट कोहली शून्याबाद बाद झाला होता. या सामन्यात विराट कोहली गोल्डन डकचा शिकार ठरला. आयपीएलमध्ये चौथ्यांदा विराट कोहली खाते न उघडता माघारी परतला आहे.