IPL 2021: आयपीएलच्या उर्वरित सामन्यांत केन विल्यमसन, राशिद खानसह अनेक खेळाडू बाहेर राहणार?
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी आपल्या खेळाडूंना सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. इंग्लंडचे 12 खेळाडू आयपीएलच्या वेगवेगळ्या संघात आहेत.
IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीगच्या सीझन 14 मधील उर्वरित 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये खेळवले जाणार आहेत. आयपीएलचे उर्वरित सामने यूएईला खेळवले जाणार आहेत. मात्र बीसीसीआयच्या समस्या कमी होताना दिसत नाहीत. केन विल्यमसन आणि राशिद खान यांच्यासह बरेच मोठे खेळाडू आयपीएल 14 च्या उर्वरित सामन्यांमधून खेळू शकणार नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार , केन विल्यमसन, राशिद खान, ट्रेंट बोल्ट, काईल जेम्ससन, लोकी फर्ग्युसन हे खेळाडू आयपीएल 14 ला पुन्हा सुरुवात होईल त्यावेळी त्यांच्या राष्ट्रीय संघासोबत व्यस्त राहतील. अफगाणिस्तानला सप्टेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध सीरिज खेळायची आहे, तर न्यूझीलंडचा संघ बांगलादेशविरूद्ध टी -20 मालिकेत व्यस्त असेल.
यापूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी आपल्या खेळाडूंना सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. इंग्लंडचे 12 खेळाडू आयपीएलच्या वेगवेगळ्या संघात आहेत.
आयपीएल संघांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता
इतकेच नाही तर आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सहभागाची शक्यताही कमी होत चालली आहे. सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला बांगलादेशविरुद्ध पाच टी -20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. ऑस्ट्रेलियाचे 18 खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियांचे किती खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकतील हे समजू शकले नाही. मोठ्या संख्येने परदेशी खेळाडू आयपीएलमधून बाहेर राहिल्यामुळे केवळ संघांचं बॅलेन्स करण्यावर वाईट परिणाम होईल. तसेच स्पर्धेच्या रोमांचमध्येही मोठी घट होऊ शकते. तसेच बीसीसीआयने परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बीसीसीआयने आयपीएल सीझन 14 मधील उर्वरित सामने भारतातून युएईमध्ये हलवण्याची घोषणा केली. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आयपीएलचं 14 वा सीजन 3 मे रोजी स्थगित करण्यात आला होता.