IPL 2021 : आयपीएल रद्द झाल्यानंतरही महेंद्र सिंह धोनीचं संघासाठी महत्त्वाचं पाऊल, जगभरातून कौतुकाचा वर्षाव
IPL 2021 : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल रद्द करण्यात आली आहे. अशातच चेन्नई संघाचा कर्णधार असलेल्या महेंद्र सिंह धोनीनं आपल्या संघासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. धोनीच्या या निर्णयामुळे जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा कर्णधार महेंद्र सिंह धोनी नेहमीच आपल्या निर्णयांमुळे चर्चेत असतो. यंदाची आयपीएल स्थगित करण्यात आली असून सर्व खेळाडू आपापल्या घरी परतण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा वाढता धोका आणि सध्या आयपीएलमधील काही खेळाडूंना झालेली कोरोनाची लागण यामुळं हा निर्णय घेण्यात आला. आयपीएल रद्द झाल्यानंतरही धोनी कर्णधार म्हणून आपल्या संघाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडत आहे. धोनीच्या या निर्णयामुळं चाहत्यांकडून कॅप्टन कूल धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेंद्र सिंह धोनीने सांगितलं की, जोपर्यंत चेन्नईच्या संघातील सर्व खेळाडू सुखरुप आपापल्या घरी पोहोचत नाहीत, तोपर्यंत तो स्वतः घरी जाणार नाही, तर हॉटेलमध्येच थांबणार. सध्या चेन्नईचे सर्व खेळाडू दिल्लीतील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. धोनीनं घेतलेल्या निर्णयामुळे जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, आयपीएलसाठी भारतात आलेले अनेक विदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत.
यंदाच्या सीझनमध्ये सीएसकेची धमाकेदार खेळी
कोरोनामुळे आयपीएलचा 14वा सीझन रद्द करण्यात आला आहे. या सीझनमधील 29 सामने कोणत्याही संकटाशिवाय पार पडले, पण त्यानंतर मात्र आयपीएलवर कोरोनाची वक्रदृष्टी पडली आणि अनेक खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. या सीझनमध्ये चेन्नईच्या संघानं धमाकेदार खेळी केल्याचं पाहायला मिळालं. संघानं सात सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. यामुळे चेन्नईचा संघ आयपीएल पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी होता.
सीएसकेच्या तीन सदस्यांना कोरोनाची लागण
चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन, बॉलिंग कोच लक्ष्मीपति बालाजी आणि फलंदाजी कोच मायकल हसी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. गुरुवारी मायकल हसी आणि लक्ष्मीपति बालाजी यांना एयर अॅम्ब्युलन्सने दिल्लीहून चेन्नईवा नेण्यात आलं होतं. सध्या ते कोरोनामुक्त झाले असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
अनेक विदेशी खेळाडू मायदेशी परतले
आयपीएल रद्द झाल्यानंतर गुरुवारी अनेक विदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेशी खेळाडू स्वदेशी परतले आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू मालदीवसाठी रवाना झाले असून तिथून परवानगी मिळाल्यानंतर सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहेत. याव्यतिरिक्त न्यूझिलंडचे अनेक खेळाडू शुक्रवारीच आपल्या मायदेशी परतले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :