(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MI vs KKR: कोलकाताचा मुंबईवर 7 गडी राखून विजय; व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठीची अर्धशतकं
Mumbai vs Kolkata: वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी हे आजच्या कोलकाताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. अय्यरने 30 चेंडूत 53 धावा केल्या. त्याचवेळी राहुलने 42 चेंडूत नाबाद 74 धावांची खेळी केली.
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: अबू धाबीच्या शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2021 च्या 34 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह कोलकात्याने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील मुंबईचा पराभवाचा बदला घेतला. मुंबईने पहिल्यांदा खेळताना 20 षटकांत 6 बाद 155 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल कोलकात्याने हे लक्ष्य 15.1 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले.
वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी हे कोलकाताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. अय्यरने 30 चेंडूत 53 धावा केल्या. त्याचवेळी राहुलने 40 चेंडूत नाबाद 72 धावांची खेळी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली.
व्यंकटेश अय्यरचं आयपीएलमध्ये पहिलं अर्धशतक
सलामीवीर व्यंकटेश अय्यरने केवळ 30 चेंडूत 53 धावांची स्फोटक खेळी खेळली. पहिल्याच चेंडूपासून त्याने मुंबईच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत चार चौकार आणि तीन षटकार मारले. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 176.67 होता. आयपीएलमधील अय्यरचे हे पहिले अर्धशतक आहे.
त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या राहुल त्रिपाठीने 42 चेंडूत नाबाद 74 धावांची खेळी खेळली. यादरम्यान, त्याच्या बॅटमधून आठ चौकार आणि तीन षटकार मारले. याशिवाय इयोन मॉर्गनने सात आणि नितीश राणाने नाबाद पाच धावा केल्या.
तत्पूर्वी, अबू धाबीच्या शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या IPL 2021 च्या 34 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सला 156 धावांचे लक्ष्य दिलं होतं. क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी मुंबईला चांगली सुरुवात दिली. पण, मधल्या षटकांमध्ये कोलकाताच्या फिरकीपटूंनी टिच्चून गोलंदाजी केली आणि मुंबईच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. अशा स्थितीत मुंबई इंडियन्सला 20 षटकांत सहा विकेटवर फक्त 155 धावा करता आल्या.
डिकॉकचं अर्धशतक
मुंबईसाठी डीकॉकने 42 चेंडूत 55 धावा केल्या. यादरम्यान त्याने चार चौकार आणि तीन षटकार ठोकले. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्माने 30 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 9.2 षटकांत 78 धावा जोडल्या. पण यानंतर कोलकाताच्या फिरकीपटूंनी फलंदाजांना रोखण्यात यश मिळवलं आहे.
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने त्याच्या चार षटकांत 22 धावा दिल्या. त्याच वेळी, सुनील नरेनने चार षटकांच्या कोट्यात अवघ्या 20 धावा देऊन एक विकेट घेतली. याशिवाय नितीश राणाने एका षटकात पाच धावा दिल्या.