IPL 2021: आरसीबीचा सलग दुसरा पराभव, बेंगळुरूला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्स गुणतालिकेत अव्वल
Bangalore vs Chennai: आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) हा सलग दुसरा पराभव आहे. त्याचबरोबर चेन्नईचा (CSK) हा सलग दुसरा विजय आहे.
Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings: शारजा येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल 2021 च्या 35 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट्सने पराभव केला. या मोसमात आरसीबीचा हा सलग दुसरा पराभव आहे. बेंगळुरूने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 156 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने 11 चेंडू राखत 4 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग पूर्ण केला. चेन्नईचा या मोसमात 9 सामन्यांमधील सातवा विजय आहे. यासह तिने पॉइंट टेबलमध्ये 14 गुणांसह पहिला क्रमांक गाठला आहे.
चेन्नईसाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 26 चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह 38 धावा केल्या. दुसरीकडे, फाफ डु प्लेसिसने 26 चेंडूत 31 धावा केल्या. त्याने आपल्या डावात दोन चौकार आणि दोन षटकार मारले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मोईन अलीने 23 आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या अंबाती रायुडूने 32 धावा केल्या. सरतेशेवटी, सुरेश रैना 10 चेंडूत 17 धावांवर आणि एमएस धोनी 9 चेंडूत 11 धावांवर नाबाद राहिला. रैनाने दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. तर धोनीने दोन चौकार लगावले.
गोलंदाजांमुळे चेन्नईचं पुनरागमन
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शानदार सुरुवात केली. पण चेन्नईच्या गोलंदाजांनी बेंगळुरूला 10 ते 15 षटकांदरम्यान किफायतशीर गोलंदाजी करून मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. चेन्नईच्या गोलंदाजांनी 10 ते 15 षटकांदरम्यान केवळ 28 धावा दिल्या. शेवटच्या पाच षटकांत बंगळुरूचा संघ केवळ 38 धावा करू शकला. अशाप्रकारे, पहिल्या 10 षटकांत कोणत्याही विकेटशिवाय 90 धावा करणाऱ्या बंगळुरूला 20 षटकांत फक्त 156 धावा करता आल्या.
कर्णधार विराट कोहलीने 41 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 53 धावा केल्या. त्याचवेळी पडिकलने 50 चेंडूत 70 धावांची खेळी खेळली. यादरम्यान, त्याच्या फलंदाजीतून पाच चौकार आणि तीन षटकार आले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला एबी डिव्हिलियर्स 11 चेंडूत एका षटकाराच्या मदतीने केवळ 12 धावा करू शकला. यासह, पदार्पण करणारा टिन डेव्हिड देखील अवघ्या एका धावेवर गेला. ग्लेन मॅक्सवेल 9 चेंडूत एका षटकारासह 11 धावा करू शकला. सरतेशेवटी हर्षल पटेन तीन धावांवर बाद झाला.
चेन्नई सुपर किंग्जसाठी ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय शार्दुल ठाकूरने दोन बळी घेतले. तर दीपक चहरला एक यश मिळाले. ब्राव्होने शेवटच्या षटकात फक्त दोन धावा दिल्या.