(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL Auction 2021 | लिलावाला चला तुम्ही, आयपीएलच्या लिलावाला चला...
IPL Player Auction 2021 : चेन्नईत उद्या आयपीएल 2021 चा लिलाव होणार आहे. यंदा आयपीएलच्या रणांगणातल्या आठ फ्रँचाईझी 292 खेळाडूंमधल्या सर्वोत्तम पर्यायांवर बोली लावताना दिसतील. कोणत्या खेळाडूंचा भाव वधारला?
मुंबई : आयपीएलचा चौदावा मोसम अजूनही महिना-दीड महिना दूर आहे. पण आगामी मोसमाच्या निमित्तानं उद्या होत असलेल्या लिलावाची उत्सुकता भारतीय क्रिकेटमध्ये सध्या शिगेला पोहोचली आहे. चेन्नईतल्या पंचतारांकित हॉटेलात आयपीएलचा लिलाव उद्या (18 फेब्रुवारी) दुपारी तीन वाजता सुरु होईल. आयपीएलच्या लिलावासाठी 1114 खेळाडूंनी आपल्या नावांची नोंदणी केली होती. त्यापैकी 164 भारतीय आणि 128 परदेशी खेळाडूंच्या नावाची लिलावासाठी छाननी करण्यात आली आहे. त्यामुळं आयपीएलच्या रणांगणातल्या आठ फ्रँचाईझी त्या 292 खेळाडूंमधल्या सर्वोत्तम पर्यायांवर बोली लावताना दिसतील.
आयपीएलच्या या लिलावात भारताच्या हरभजनसिंग आणि केदार जाधव यांच्यासह अकरा परदेशी शिलेदारांना मोठा भाव येण्याची शक्यता आहे. हरभजन आणि केदार जाधव यांना चेन्नई सुपर किंग्सनं आपल्या कॉण्ट्रॅक्टमधून पुन्हा लिलावासाठी मोकळं केलं आहे. त्या दोघांसह अकरा परदेशी शिलेदारांची मूळ किंमत दोन कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, शकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लन्केट, जेसन रॉय आणि मार्क वूड यांचा त्या अकराजणांत समावेश आहे.
आयपीएलच्या या लिलावात बारा परदेशी खेळाडूंची मूळ किंमत दीड कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. हनुमा विहारी आणि उमेश यादव यांच्यासह नऊ परदेशी खेळाडूंसाठी एक कोटी रुपयांची मूळ किंमत ठरवण्यात आली आहे. हनुमा विहारी हा मूळचा दिल्ली कॅपिटल्सचा, तर उमेश यादव हा मूळचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा शिलेदार आहे. त्याशिवाय पंधरा परदेशी खेळाडूंसाठी 75 लाख रुपयांची, तर 65 देशीविदेशी खेळाडूंसाठी 50 लाख रुपयांची मूळ किंमत निश्चित करण्यात आली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर हाही या लिलावाचं मुख्य आकर्षण ठरण्याची चिन्हं आहेत. यंदाच्या मोसमात सय्यद मुश्ताक अली करंडकात मुंबईच्या सीनियर ट्वेन्टी20 संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी अर्जुनला देण्यात आली होती. खरं तर मुश्ताक अली करंडकातल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी यथातथाच झाली. पण सीनियर संघातून राष्ट्रीय पातळीवर सहभागी झाल्याच्या निकषावर तो आयपीएलच्या लिलावासाठी पात्र ठरला आहे. अर्जुननं या लिलावासाठी आपली मूळ किंमत ही 20 लाख रुपये निश्चित केली आहे. अर्जुनचा आजवरचा अनुभव आणि त्याची गुणवत्ता लक्षात घेता खरं तर हा सौदा महागडा ठरु शकतो. पण तरीही नीता अंबानींची मुंबई इंडियन्स 'तेंडुलकर ब्रॅण्ड'ला आपल्या ताफ्यात सामील करुन घ्यायला उत्सुक असल्याचं बोललं जातं.
आयपीएलच्या या लिलावाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही फ्रँचाईझीला सरसकट कुणावरही बोली लावता येणार नाही. कारण त्यांच्या खजिन्यातल्या 85 कोटी रुपयांच्या रकमेपैकी शिल्लक रकमेतच लिलावाचे व्यवहार करण्याची मर्यादा त्यांच्यावर आहे. त्यामुळं शिल्लक रकमेत अधिकाधिक खेळाडूंचा सौदा कसा करता येईल याची आकडेमोड सतत त्या फ्रँचाईझींच्या टेबलवर सुरु राहिल.
मुंबई इंडियन्स संघात आगामी मोसमासाठी सात शिलेदारांच्या जागा भरता येऊ शकतात. त्या सातजणांत चार परदेशी शिलेदारांचा समावेश करता येऊ शकतो. पण मुंबई इंडियन्सच्या खजिन्यात त्यासाठी फक्त 15.35 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. त्यांनी 69.65 कोटी रुपयांची रक्कम आतापर्यंत खर्च केली आहे. त्यामुळं नीता अंबानी आणि त्यांच्या सल्लागारांना हातचं राखून लिलावाचा सौदा करावा लागणार आहे.
आयपीएलच्या लिलावात पंजाब किंग्स ही सर्वात श्रीमंत फ्रँचाईझी ठरावी. प्रीती झिंटा आणि तिच्यासोबतच्या को-ओनरच्या गंगाजळीत सध्या तब्बल 54.20 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. या रकमेत पंजाब किंग्स पाच परदेशी खेळाडूंसह नऊ शिलेदारांवर बोली लावता येणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स या फ्रँचाईझींना अनुक्रमे 35.40 कोटी आणि 37.85 कोटी रुपयांची रक्कम खर्च करता येऊ शकते. या रकमेत बंगळुरुला चार परदेशी खेळाडूंसह 11, तर राजस्थानला तीन परदेशी खेळाडूंसह नऊ शिलेदारांना आपल्या ताफ्यात सामील करण्याची संधी आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या खजिन्यात अजूनही 19.9 कोटी रुपयांची रक्कम आहे. या रकमेत चेन्नईला एका परदेशी खेळाडूसह सहा शिलेदारांवर बोली लावता येईल. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांना या लिलावात फार मोठी बोली लावता येणार नाही. दिल्लीच्या खजिन्यात 13.4 कोटी, तर कोलकाता आणि हैदराबादच्या खजिन्यात पावणेअकरा कोटी इतकीच रक्कम शिल्लक आहे. हैदराबादच्या दृष्टीनं त्यांच्या खजिन्यातली शिल्लक मोठी अडचण ठरु नये. कारण हैदराबादला एका परदेशी शिलेदारासह केवळ तीन खेळाडूंवरच बोली लावता येणार आहे. त्याच्या संघात तेवढ्याच जागा मोकळ्या आहेत. पण दिल्लीला 13.4 कोटी रुपयांत तीन परदेशी खेळाडूंसह आठ जणांवर आणि कोलकात्याला पावणेअकरा कोटीत दोन परदेशी खेळाडूंसह आठ जणांवर बोली लावायची आहे.