(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020 MI vs KXIP | अफलातून क्षेत्ररक्षण, जबरदस्त फलंदाजी; दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मयंकची कमाल
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांमध्ये रविवारी सुरु झालेला सामना सोमवार उजाडल्यावर संपला. याचं कारण म्हणजे दोन सुपर ओव्हर.मयंक अग्रवालने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये षटकार रोखला आणि हाच सामन्याचं चित्र बदलणारा क्षण ठरला.
दुबई : आयपीएलचा 36वा सामना मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांमध्ये झाला. रोमांचक आणि थरारक असंच या सामन्याचा वर्णन करता येईल. एखादा सामना दोन वेळा सुपर ओव्हरपर्यंत जाण्याची ही पहिलीच वेळ असावी. सामन्यात मुंबईने पहिल्यांचा फलंदाजी करताना 6 विकेट्सच्या मोबदल्यात 176 धावा केल्या. क्विंटन डि कॉकने 53 धावा आणि कायरन पोलार्डने 12 चेंडूंमध्ये नाबाद 34 धावा बनवल्या. याच्या प्रत्युत्तरादाखल किंग्ज इलेव्हन पंजाबलाही 6 विकेट्स गमावून 176 धावाच करता आल्या. केएल राहुलने 51 चेंडूंमध्ये 77 धावा केल्या.
सामना टाय झाल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. पंजाबने सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी केली. केएल राहुल आणि निकोलस पूरन फलंदाजीसाठी मैदानात उतरले. दुसऱ्या चेंडूवर पूरन आणि षटकाच्या अखेरच्या चेंडूवर राहुल बाद झाला. जसप्रीत बुमराच्या या षटकात पंजाबला केवळ पाचच धावा बनवता आल्या.
पण सुपर ओव्हरमध्ये मुंबईकडून मैदानात आलेल्या रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनाही पाचच धावा बनवता आल्या आणि सामन्याचा रोमांच आणखीच वाढला. म्हणजेच सामना टाय आणि सुपर ओव्हरही टाय. पंजाबकडून हे षटकात मोहम्मद शमीने गोलंदाजी केली होती.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सामन्याचं चित्र बदलणारा क्षण मग झाली दुसरी सुपर ओव्हर. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून क्रिस जॉर्डनने सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. मुंबईने पहिल्या पाच चेंडूत नऊ धावा मिळवल्या. सहाव्या चेंडूवर कायरन पोलार्डने ताकदीने चेंडू टोलवला. पण डीप मिडविकेट बाऊंड्रीवर मयंक अग्रवालने अतिशय चपळाईने उडी मारली आणि चेंडू झेलला. प्रसंगावधान राखून त्याने सीमारेषेला स्पर्श होण्यापूर्वीच चेंडू मैदानात फेकला.
How many retweets for this effort by @mayankcricket ?#Dream11IPL pic.twitter.com/RFVixzflDr
— IndianPremierLeague (@IPL) October 18, 2020
जिथे पोलार्ड आणि मुंबईला सहा धावा मिळू शकल्या असत्या, तिथे दोनच धावा मिळाल्या आणि ते घडलं मयंक अग्रवालच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. क्रिकेटच्या खेळात एक-एक धाव मौल्यवान असते, तिथे मयंक अग्रवालने आपल्या संघासाठी चार धावा वाचवल्या आणि क्षेत्ररक्षणातील त्याच्या याच प्रयत्नाने सामन्याचा निकाल बदलला तर वावगं ठरणार नाही.
किंग्स इलेव्हन पंजाबला 12 धावांचं लक्ष्य मिळालं. पहिल्याच चेंडूवर ख्रिस गेलने षटकार ठोकून तणाव काहीसा कमी केला. त्यानंतर मयंक अग्रवालने दोन चौकार लगावले आणि किंग्स इलेव्हन पंजाबने सामना जिंकला. परंतु जर मयंक अग्रवाल तो षटकार रोखला नसता तर पंजाबला 12 नाही तर 16 धावांचं लक्ष्य मिळालं असतं, जे नक्कीच काहीसं अडचणीचं ठरलं असतं.
How many retweets for this effort by @mayankcricket ?#Dream11IPL pic.twitter.com/RFVixzflDr
— IndianPremierLeague (@IPL) October 18, 2020