(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022 : मुंबई पुन्हा हरणार? पाहा संघाची कमकुवत बाजू
Mumbai Indians : आयपीएलच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे. पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबईला यंदा आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
IPL 2022, Mumbai Indians : आयपीएलच्या 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे. पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबईला यंदा आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सुरुवातीच्या सहाही सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. गुरुवारी मुंबईचा संघ (Mumbai Indians) चेन्नईसोबत (Chennai Super Kings) दोन हात करणार आहे. या सामन्यात मुंबईच्या विजयाची शक्यता कमीच असल्याचे दिसत आहे. त्यामागे कारणही तसेच आहे. पाहूयात... कोणत्या कारणामुले मुंबईला चेन्नईविरोधात पराभवाचा सामना करावा लागू शकतो.
रोहित शर्मा आणि ईशान किशन -
मुंबई इंडियन्ससाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे रोहित शर्मा आणि ईशान किशन यांचा फॉर्म होय. या दोन्ही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 15 कोटींपेक्षा जास्त रुपयांना खरेदी केलेल्या ईशान किशानला कामगिरीत सातत्या राखता आलेलं नाही. ईशान किशन संघर्ष करताना दिसत आहे. पहिल्या दोन सामन्यात ईशान किशनने दमदार खेळी केली, पण त्यानंतर बॅट शांतच राहिली. विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान किशन आणि रोहित शर्माला मोठी सलामी देण्यात अपयश आले आहे. रोहित शर्माने 19 च्या सरासरी फक्त 114 धावा केल्या आहेत. सहा डावात रोहित शर्माने 41, 10, 3, 26, 28, 6 इतक्या धावा केल्या आहेत. रोहित आणि ईशान किशान यांचा फॉर्म ईशान किशनसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
एकटाच पडला बुमराह -
जसप्रीत बुमराहच्या तोडीचा गोलंदाज मुंबई इंडियन्सकडे नाही. लसिथ मलिंगा, ट्रेन्ट बोल्ट यांच्यानंतर मुंबईला तसा गोलंदाज मिळाला नाही. त्यामुळे गोलंदाजीचा सर्व भार एकट्या बुमराहवर पडला आहे. थंपी, जयदेव उनादकट, एम अश्विन आणि मिल्स यांना धारधार गोलंदाजी करता आलेली नाही. विकेट घेण्यात तर अपयश आलेच, शिवाय धावाही रोखता आलेल्या नाहीत. त्यामुळे मुंबईची गोलंदाजी कमकुवत जाणवत आहे.
संघाचं संतुलन -
पाच वेळच्या विजेत्या मुंबईला सहा सामन्यानंतरही योग्य असं संतुलन मिळालेलं नाही. याचा फटका मुंबईला आतापर्यंत बसला आहे. चेन्नईविरोधातही मुंबईला संघाचं संतुलन ठेवता आलं नाही, तर कदाचीत पराभवाला सामोरं जावं लागू शकते.