(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DC vs PBKS, IPL 2022 : फिरकीच्या जाळ्यात अडकले पंजाबचे 'किंग्स', दिल्लीचा 9 गड्यांनी विजय
DC vs PBKS, IPL 2022 : दिल्लीच्या फरकी गोलंदाजांनी आधी पंजाबच्या फलंदाजांना अडकवले, त्यानंतर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांनी पंजाबच्या गोलंदाजांना धू धू धुतले.
DC vs PBKS, IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकी गोलंदाजीपुढे पंजाबच्या संघाची पुरती तारांबळ उडाली. दिल्लीच्या फरकी गोलंदाजांनी आधी पंजाबच्या फलंदाजांना अडकवले, त्यानंतर पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांनी पंजाबच्या गोलंदाजांना धू धू धुतले. बुधवारी झालेल्या एकतर्फी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 9 गड्यांनी पराभव केला. दिल्लीच्या गोलंदाजांनी पंजाबला 115 धावांवर रोखलं. त्यानंतर दिल्लीच्या फलंदाजांनी हे आव्हान 58 चेंडू आणि 9 गडी राखून सहज पार केले.
दिल्ली संघाची भेदक गोलंदाजी
दिल्ली संघाकडून सर्वच गोलंदाजांनी भेदक मारा केला. शार्दूल ठाकूरचा अपवाद वगळता प्रत्येक गोलंदाजांनी विकेट्स पटकावल्या. खलील अहमदने सर्वात बेस्ट गोलंदाजी करत 4 ओव्हरमध्ये 21 धावा देत दोन विकेट्स पटकावले आहेत. त्याच्यासोबत ललित यादव, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या तिन्ही फिरकीपटूंनी देखील प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर मुस्तफिजूरने महत्त्वाची अशी मयांक अगरवालची एक विकेट घेतली आहे.
Match 32. Delhi Capitals Won by 9 Wicket(s) https://t.co/3MYNGBlzNI #DCvPBKS #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
पंजाबच्या फलंदाजांचा फ्लॉप शो -
आयपीएलच्या 32 व्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भेदक मारा केला. दिल्लीच्या गोलंदाजांपुढे पंजाबच्या एकाही फलंदाजांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. दिग्गज फलंदाज स्पशेल अपयशी ठरले. 54 धावात पंजाबने 4 विकेट गमावल्या होत्या. पंजाबकडून जितेश शर्माने सर्वाधिक 32 धावा केल्या. त्याशिवाय मयांक अग्रवाल याने 24 धावांची खेळी केली. यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फंलदाजी करता आलेली नाही. सात फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पंजाबचा संघ 115 धावांपर्यंत मजल मारु शकला.
शॉ-वॉर्नरची फटकेबाजी, पंजाबचे गोलंदाज ढेपाळले -
पंजाबने दिलेल्या 116 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या सलामी फलंदाजांनी स्फोटक सुरुवात केली. पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांनी धावांचा पाऊस पाडला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 6.3 षटकात 83 धावांची सलामी दिली. शॉने 20 चेंडूवर 41 धावांची विस्फोटक खेळी केली. तर वॉर्नरने 30 चेंडूत 60 धावांची नाबाद खेळी केली. दिल्लीने 57 चेंडू आणि 9 विकेट राखून विजय नोंदवला. डेविड वॉर्नरचं आयपीएल 2022 मधील हे तिसरं अर्धशतक होय. वॉर्नरने याआधी केकेआर आणि आरसीबीविरोधात अर्धशतकी खेळी केली.