IPL 2023 : रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, दोन्ही संघात महत्वाचे बदल, पाहा प्लेईंग 11
IPL 2023, Match 16, DC vs MI: रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
DC vs MI IPL 2023 Live : रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. दिल्ली आणि मुंबई संघामध्ये बदल करण्यात आले आहेत. दिल्लीकडून रिले मेरेडिथ याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. तर दिल्लीने मुस्तफिजुर रहमान आणि यश धुल याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. दिल्ली आणि मुंबई आयपीएल 16 च्या तळाशी आहेत. दोन्ही संघाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत.
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. दिल्लीचा तीन आणि मुंबई इंडियन्सचा दोन सामन्यात पराभव झालाय. हे दोन्ही संघ विजयाचे खाते उघडण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. गुणतालिकेत दिल्ली आणि मुंबई संघ तळाशी आहेत, दोन्ही संघाला आतापर्यंत लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्मा आणि डेविड वॉर्नर यांना अंतिम 11 खेळाडू अद्याप मिळालेले नाही. प्रत्येक सामन्यात बदल पाहायला मिळतात. दिल्लीच्या संघाला ऋषभ पंतची कमी जाणवत आहे, तर मुंबईचा संघ जसप्रीत बुमराहाशिवाय कमकुवत वाटत आहे. पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11...
DC vs MI Live: मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, ऋतिक शौकीन, अरशद खान, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ
DC vs MI Live Score: दिल्लीचे 11 शिलेदार कोण ?
पृथ्वी शॉ, डेविड वार्नर (कर्णधार), मनिष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्खे, मुस्तफिजुर रहमान
दिल्ली कुठे ठरतेय कमकुवत -
2022 च्या अखेरीस ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला होता, यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे तो आयपीएलच्या संपूर्ण हंगामाला मुकलाय. पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीचा मध्यक्रम कमकुवत जाणवतोय. त्याशिवाय विकेटकिपर म्हणून पहिल्या सामन्यात सरफराज खानला उतरवले होते तर दोन सामन्यात पोरेल याला स्थान दिले होते. पण पोरेल याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव कमी आहे. सरफराज देशांतर्गत क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग करत नाही. दिल्लीला तिन्ही सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. लखनौ, गुजरात आणि राजस्थान या संघांनी दिल्लीचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. डेविड वॉर्नर फलंदाजीत धावा काढतोय, पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळत नाही. वॉर्नर याचा स्ट्राइक रेटही कमीच आहे. वॉर्नर याने तीन सामन्यात 158 धावा चोपल्या आहेत, यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट फक्त 117 इतकाच राहिलाय. पृथ्वी शॉ दोन्ही तिन्ही सामन्यात फ्लॉप गेलाय. त्याला फक्त 19 धावा काढता आल्यात. सरफराज, मिशेल मार्श, रोवमन पॉवेल, रायली रुसो, ललित यादव, मनिष पांडे आणि हकीम खान यासारखे फलंदाज अपयशी ठरत आहेत. दिल्लीला विजय मिळवायचा असेल तर फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. दिल्लीच्या गोलंदाजीतही धार दिसत नाही. खलील अहमद, मुकेश कुमार, चेतन सकारिया, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना अद्याप लय मिळालेली नाही. एनरिक नॉर्खिया यालाही दोन सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही.
मुंबईची अवस्था कशी -
दिल्लीप्रमाणे मुंबईची फलंदाजी आणि गोलंदाजी कमकुवत आहे. रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कॅमरुन ग्रीन, टिम डेविड यांना मोठी खेळी करता आली नाही. तिलक वर्मा याने पहिल्या सामन्यात नाबाद 84 धावांची खेळी केली होती. त्याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही. गोलंदाजीतही मुंबई कमकुवत दिसत आहे. बुमराहची कमी खालावल्याचे दोन्ही सामन्यात दिसले. जोफ्रा आर्चर लयीत नाही. जेसन बेहरेनडोर्फ, ग्रीन, आर्चर आणि अरशद खान अद्याप छाप पाडू शकले नाहीत. पीयूष चावला, ऋतिक शौकीन आणि कुमार कार्तिकेय यांनाही विकेट घेण्यात अपयश येतेय. टी 20 मधील आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीन हे विस्फोटक फलंदाज असतानाही मुंबईला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.