CSK vs KKR: रोमहर्षक सामन्यात शेवटच्या चेंडूवर कोलकाताला पराभूत करत चेन्नईची विजयी हॅटट्रिक
Chennai vs Kolkata: रवींद्र जडेजा चेन्नईच्या या विजयाचा नायक होता. त्याने प्रसिद्ध कृष्णाकडून चार चेंडूंमध्ये दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले आणि चेन्नईला जवळजवळ हरवलेल्या सामन्यात विजय मिळवून दिला.

Chennai vs Kolkata: अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर आयपीएल 2021 चा 38 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अनेक ट्विस्ट पाहायला मिळाला. पण, अखेरीस चेन्नईने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात चेन्नई सुपर किंग्जचा हा सलग तिसरा विजय आहे. यासह ती पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.
कोलकात्याने पहिल्यांदा खेळत 20 षटकांत सहा गडी बाद 171 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून, शानदार सुरुवात करणाऱ्या चेन्नईने एका टप्प्यावर 17.3 षटकांत 142 धावांवर आपले सहा गडी गमावले. जेव्हा चेन्नईला शेवटच्या 10 चेंडूंत जिंकण्यासाठी 24 धावांची गरज होती, तेव्हा असे वाटत होते की सामना त्यांच्या हातातून गेला आहे. पण त्यानंतर रवींद्र जडेजाने प्रसिद्ध कृष्णाच्या चार चेंडूंमध्ये दोन चौकार आणि दोन षटकार ठोकत चेन्नईने जवळपास गमावलेल्या सामन्यात विजय मिळवून दिला.
रवींद्र जडेजाने आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचे मनोरंजन करत 8 चेंडूत 22 धावा करत विजश्री अक्षरशः खेचून आणला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सवर दोन विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली.
चेन्नईसमोर 172 धावांचे लक्ष्य होते. फाफ डु प्लेसिस (30 चेंडूत 44) आणि ऋतुराज गायकवाड (28 चेंडूत 40) यांनी पहिल्या विकेटसाठी 74 धावा जोडून चांगली सुरुवात केली. मोईन अलीने 28 चेंडूत 32 धावा केल्या. पण, जडेजानेच कठीण परिस्थितीत दोन चौकार आणि दोन षटकार ठोकत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शुभमन गिल पाच चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 9 धावा केल्यावर धावबाद झाला. यानंतर उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला वेंकटेश अय्यर 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 15 चेंडूंचा सामना केला आणि एकूण तीन चौकार मारले.
यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला इऑन मॉर्गन काही खास कामगिरी करू शकला नाही. तो 14 चेंडूत आठ धावांवर बाद झाला. फाफ डु प्लेसिसने बाऊंड्री लाईनवर त्याचा शानदार झेल घेतला. मात्र, दुसऱ्या टोकाला राहुल त्रिपाठीने एक बाजू लावून धरत फटकेबाजी सुरुच ठेवली आणि केकेआरला दबावात येऊ दिलं नाही. त्याने 33 चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 45 धावा केल्या.
मॉर्गन बाद झाल्यानंतर नितीश राणा क्रीजवर आला. राणाने पहिल्यांदा आंद्रे रसेलसोबत 36 धावांची भागीदारी केली. रसेलने 15 चेंडूत 20 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या फलंदाजीतून दोन चौकार आणि एक षटकार आला. त्याला शारदल ठाकूरने बोल्ड केले. त्याचवेळी नितीश राणा 37 धावांवर नाबाद राहिला. राणाने 27 चेंडूंचा सामना करताना तीन चौकार आणि एक षटकार मारला. अखेरीस दिनेश कार्तिकने 11 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावांची स्फोटक खेळी खेळली. शेवटच्या तीन षटकांत राणा आणि कार्तिकने वेगवान धावा केल्या आणि धावसंख्या 170 च्या पुढे नेली.
चेन्नईकडून जोश हेजलवूड आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी दोन बळी घेतले. तर रवींद्र जडेजाला एक यश मिळाले. ड्वेन ब्राव्होच्या जागी संघात आलेल्या सॅम कुर्रनसाठी आजचा दिवस खास नव्हता. त्याने चार षटकांत एकही विकेट न घेता 56 धावा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
