(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2021, RCB vs MI: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर पराभवाची हॅटट्रिक टाळण्यासाठी आमनेसामने
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे संघ आतापर्यंत एकूण 28 वेळा आमनेसामने आले आहेत. यात मुंबई इंडियन्सने 28 पैकी 17 सामने जिंकले आहेत तर बंगलोरने 11 सामने जिंकले आहेत.
Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians: आयपीएल सुपर संडेमध्ये आज दुसरा सामना विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. दुबईमध्ये संध्याकाळी 7.30 पासून हा सामना खेळला जाईल. हा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. तसेच, हा सामना हाय स्कोअरिंग देखील होण्याची दाट शक्यता आहे.
आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात या दोन्ही संघांनी अद्याप एकही विजय मिळवलेला नाही. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशा स्थितीत दोन्ही संघ रविवारी पराभवाची हॅटट्रिक टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. विशेष म्हणजे दोन्ही संघांना चेन्नई आणि कोलकाताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे संघ आतापर्यंत एकूण 28 वेळा आमनेसामने आले आहेत. या दरम्यान रोहितच्या मुंबई इंडियन्सचा वरचष्मा राहिला आहे. मुंबई इंडियन्सने 28 पैकी 17 सामने जिंकले आहेत. तर RCB ने फक्त 11 सामने जिंकले आहेत.
पॉईंट टेबलमध्ये कोण कुठे?
विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ 10 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत या मोसमात बंगलोरने 9 सामने खेळले आहेत, त्यापैकी पाच सामने त्यांनी जिंकले आहेत. त्याचबरोबर सलग दोन पराभवांनंतर रोहितचा मुंबई संघ नऊ सामन्यांत आठ गुणांसह सहाव्या स्थानावर घसरला आहे. मुंबईने या मोसमात आतापर्यंत 9 सामन्यांत केवळ चार सामने जिंकले आहेत.
आयपीएल 2021 च्या पूर्वार्धात जेव्हा हे दोन संघ समोरासमोर आले, तेव्हा विराट कोहलीच्या संघाने विजय मिळवला होता. त्या सामन्यात मुंबईने प्रथम फंलदाजी करत रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरला 160 धावांचे लक्ष्य दिलं होतं. जे विराटच्या संघाने आठ गडी गमावून पूर्ण केले.