Rajat Patidar : बंगळुरुला सामना जिंकवणारा रजत आधी होणार होता गोलंदाज, 'या' कारणामुळे बदलला निर्णय
RCB vs LSG : बंगळुरु संघाने लखनौला 14 धावांनी मात देत क्वॉलीफायर सामन्यात एन्ट्री मिळवली. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रजत पाटीदारला आधी गोलंदाज व्हायचं होतं, पण एका घटनेने त्याने निर्णय बदलला.
![Rajat Patidar : बंगळुरुला सामना जिंकवणारा रजत आधी होणार होता गोलंदाज, 'या' कारणामुळे बदलला निर्णय Madhya pradesh cricketer Rajat patidar wanted to became bowler but his accident changed the decision Rajat Patidar : बंगळुरुला सामना जिंकवणारा रजत आधी होणार होता गोलंदाज, 'या' कारणामुळे बदलला निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/26/9cbe76f10c8614040abd098380653623_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rajat Patidar : आयपीएल 2022 (Ipl 2022) स्पर्धेच्या एलिमेनेटर सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरुने लखनौ संघाला मात देत क्वॉलीफायर 2 मध्ये झेप घेतली आहे. सामन्यात बंगळुरु संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो फलंदाज रजत पाटीदार (Rajat Patidar). त्याने दमदार अशी 112 धावांची नाबाद खेळी केली. ज्यामुळे बंगळुरु संघाने 207 धावा करत लखनौला 208 धावांचे आव्हान दिले. जे लखनौ पूर्ण न करु शकल्याने बंगळुरु जिंकली. पण विशेष गोष्ट म्हणजे फलंदाजीने सर्वांची मनं जिंकणारा रजत आधी मात्र गोलंदाज होणार होता. तसंच त्याला त्याच्या संघातील खेळाडू 'हनुमान' म्हणत असल्याचंही समोर आलं आहे.
दुखापतीमुळे बदलला निर्णय
रजतने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात एक गोलंदाज म्हणून केली होती. पण 2014 साली फुटबॉल खेळताना त्याला दुखापत झाली, ज्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. ज्यामुळे आठ महिने तो क्रिकेटपासून दूर होता. त्यावेळी अनेकांनी त्याला अनेक सल्ले दिले. पण त्याने त्याच्या फलंदाजीवर बराच परिश्रम घेतला. भारताचे माजी फलंदाज अमय खुरासिया यांनी त्याची ट्रेनिंग घेतली. ज्यानंतर तो एक फलंदाज म्हणून समोर आला.
सोबती खेळाडूंनी दिलं 'हनुमान' नाव
रजत मध्य प्रदेशसाठी स्थानिक क्रिकेट खेळतो. त्याने 2015 साली डेब्यू केला होता. त्याच्याबद्दल बोलताना एकदा गोलंदाज ईश्वर पांडे (Ishwar Pandey) यांनी तो संघासाठी हनुमानासारखा आहे. कायम संकटात संघाची मदत करण्यासाठी येत असतो. त्याने अनेक अशा दमदार खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे रजतला हनुमान हे नाव पडलं. विशेष म्हणजे महत्त्वाच्या सामन्यात रजत आरसीबीसाठीही हनुमानच ठरला आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)