CSK Captain 2023 IPL: धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; पुढील आयपीएलमध्ये चेन्नईची धुरा पुन्हा माहीकडे, CSKकडून शिक्कामोर्तब
महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni)चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.चेन्नई सुपर किंग्ज (CSK)च्या कर्णधारपदी पुन्हा महेंद्रसिंह धोनी विराजमान होणार आहे.
MS Dhoni CSK Captaincy in IPL: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni)चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.चेन्नई सुपर किंग्ज (CSK)च्या कर्णधारपदी पुन्हा महेंद्रसिंह धोनी विराजमान होणार आहे. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळत आहे. अशा स्थितीत धोनी पुढच्या सत्रातही खेळणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात असेल. मात्र धोनी पुढची आयपीएल केवळ खेळणारच नाही तर तो चेन्नईच्या संघाचं नेतृत्व देखील करणार आहे.
चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना विश्वनाथन यांनी सांगितले की, 'महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएल हंगामात चेन्नई संघाचा कर्णधार असेल. या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही ते म्हणाले. गेल्या मोसमात रवींद्र जाडेजाकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.
धोनीने संघाला सर्वाधिक 4 वेळा विजेतेपद मिळवून दिले
2008 साली आयपीएल सुरू झाले. तेव्हापासून धोनी चेन्नई संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्याने संघाला सर्वाधिक 4 वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. गेल्या म्हणजेच आयपीएल 2022 च्या मोसमात चेन्नई फ्रँचायझीने काही बदल केले होते. फ्रँचायझीने प्रथमच धोनीला कर्णधारपदावरून हटवले होते. धोनीने स्वत: रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले होते. पण या मोसमात संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती. खराब कामगिरीनंतर जाडेजाने मध्येच कर्णधारपद सोडले होते. जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने सुरुवातीच्या 8 सामन्यांपैकी केवळ 2 सामने जिंकले होते. त्याचवेळी जाडेजाच्या कामगिरीवरही परिणाम झाला होता. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत तो फ्लॉप दिसत होता. त्यानंतर स्वतः जाडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा देत पुन्हा धोनीकडे नेतृत्व सोपवले. मात्र तरीही चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.
अशा परिस्थितीत 41 वर्षांचा धोनी पुन्हा मैदानात खेळताना दिसणार की नाही? अशी शक्यता वर्तवली जात होती. असं मानलं जात होतं की पुढील आयपीएल हंगामात चेन्नई संघाचा नवा कर्णधार येऊ शकतो. पण आता फ्रँचायझीने स्पष्ट केले आहे की, धोनीच चेन्नईच्या कर्णधारपदाची कमान हाती घेणार आहे.
फ्रँचायझीने कर्णधार एमएस धोनीला 12 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते
चेन्नई फ्रँचायझीने आयपीएल 2022 मेगा लिलावापूर्वी 4 खेळाडूंना कायम ठेवले होते. त्याने सर्वाधिक रक्कम अष्टपैलू रवींद्र जडेजावर खर्च केली होती. ज्याला 16 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले होते. या फ्रँचायझीने कर्णधार एमएस धोनीला 12 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. त्याचबरोबर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली आणि भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाड यांना 8-8 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Virat Kohli: आशिया चषकापूर्वी विराट कोहलीला धोनीची आठवण, इन्स्टाग्रामवर लिहिली खास पोस्ट!
Sanju Samson: 'मॅन ऑफ द मॅच' जिंकताच संजू सॅमसनची खास क्लबमध्ये एन्ट्री! यादीत धोनी अजूनही अव्वल