IPL 2020, CSKvsSRH | चेन्नईची पराभवाची हॅटट्रिक, हैदराबादकडून 7 धावांनी पराभव
हैदराबादच्या गोलंदाजीपुढे चेन्नईच्या फलंदाजांना मोठे फटके मारता आले नाही. धोनी-जाडेजाने शेवटी फटकेबाजी मात्र त्याचं विजयात रुपांतर करता आलं नाही. चेन्नईला 157 धावांपर्यंतच मजल मारता आली.
दुबई : आयपीएलच्या 13 व्या सीजनमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज सुरुवात अंत्यत खराब झाली आहे. सलग तिसऱ्या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सनराईजर्स हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्जवर 7 धावांनी मात केली. मुंबई इंडियन्सला परभूत केल्यानंतर चेन्नईला राजस्थान, दिल्ली आणि हैदराबादने पराभूत केलं. 165 धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या गोलंदाजीपुढे चेन्नईच्या फलंदाजांना मोठे फटके मारता आले नाही. धोनी-जाडेजाने शेवटी फटकेबाजी केली. मात्र त्याचं विजयात रुपांतर करता आलं नाही. चेन्नईला 157 धावांपर्यंतच मजल मारता आली.
हैदराबादने दिलेल्या 165 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरवात खराब झाली. तिसऱ्याच ओव्हरमध्ये शेन वॉटसन 1 धाव करत माघारी परतला. त्यांनंतर अंबाती रायडूही 8 धावा करत स्वतात परतला. फॉर्ममध्ये असलेल्या फाफ डु-प्लेसिसही रन आऊट झाला. केदार जाधवही 3 धावा करुन बाद झाला. त्यानंतर रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी चांगली खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेलं. दोघांनी 72 धावांची पार्टनरशीप केली. रवींद्र जाडेजाने 50 धावांची तर धोनीने 47 धावांची नाबाद खेळी केली. हैदराबादकडून टी. नटराजनने 2, भुवनेश्वर कुमारने 1 तर अब्दुल समादने 1 विकेट घेतली.
त्याआधी, हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादची सुरुवात खराब झाली. डेविड वॉर्नर, बेअरस्टो, मनीष पांडे, विल्यमसन स्वस्तात माघारी गेले. त्यानंतर प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा यांना डावाच्या शेवटी फटकेबाजी करत हैदराबादला 164 धावांचा टप्पा गाठून दिला. हैदराबादकडून प्रियम गर्गने नाबाद 51 धावा केल्या. तर अभिषेक शर्मा 31, मनीष पांडेने 29 आणि डेव्हिड वॉर्नरने 28 धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहरने 2 तर शार्दुल ठाकूर आणि पियुष चावलाने प्रत्येकी एक-एक बळी घेतला.