किंग्स इलेव्हन पंजाबकडून राजस्थान रॉयल्सचा 12 धावांनी पराभव
लोकेश राहुलनं या सामन्यात 47 चेंडूत 52 धावा केल्या. राहुलचं यंदाच्या आयपीएलमधलं हे चौथं अर्धशतक ठरलं.
मोहाली : किंग्स इलेव्हन पंजाबनं राजस्थान रॉयल्सचा 12 धावांनी पराभव करुन यंदाच्या आयपीएलमधला पाचवा विजय साजरा केला. या विजयासह पंजाबनं गुणतालिकेत चौथं स्थान गाठलं आहे. तर राजस्थान रॉयल्स यंदा पराभवाचा षटकार ठोकणारा बंगलोरनंतरचा दुसरा संघ ठरला. या सामन्यात पंजाबनं दिलेलं 183 धावांचं लक्ष्य राजस्थानला पेलवलं नाही. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबला सात बाद 170 धावाच करता आल्या.
पंजाबच्या 183 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या राजस्थानकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 50 धावा करत एकाकी झुंझ दिली. स्टुअर्ट बिन्नी 11 चेंडूत 33 धावा ठोकत शेवटच्या क्षणी विजयासाठी प्रयत्न केले. संजू सॅमसंगने 27, अजिंक्य रहाणेने 26 आणि जोस बटलरने 23 धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंग, अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
त्याआधी लोकेश राहुल आणि डेव्हिड मिलरनं रचलेल्या दमदार भागिदारीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबला 183 धावांचं लक्ष गाठता आलं. लोकेश राहुलनं या सामन्यात 47 चेंडूत 52 धावा केल्या. राहुलचं यंदाच्या आयपीएलमधलं हे चौथं अर्धशतक ठरलं. त्यानंतर डेव्हिड मिलरनंही 40 धावांची खेळी करुन राहुलला सुरेख साथ दिली. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी रचली. क्रिस गेलने 30, मयंक अगरवालने 26 आणि कर्णधार अश्विनने 4 चेंडूत 17 धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरनं प्रभावी मारा करताना 15 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं.