IndvsENG Test : इंग्लंडच्या खेळाडूंकडून बॉल टॅम्परिंग? दिग्गजांकडून सवाल उपस्थित, फोटो व्हायरल
इंडिया आणि इंग्लंड कसोटीच्या चौथ्या दिवशीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंग्लंडचे खेळाडू आपल्या बुटांच्या स्पाईक्सने चेंडू दाबत आहेत आणि ते स्पाईक्सने घासण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
INDIA vs ENGLAND 2nd Test : टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. आज शेवटच्या दिवशी सामना वाचवण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. चौथ्या दिवशी 55 धावांत तीन विकेट्स पडल्यानंतर चेतेश्वर पुजारा (45) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (61) यांनी चिवट खेळी करत भारताचा डाव सावरला. परंतु अखेरच्या सत्रात या दोघांसह रवींद्र जाडेजासुद्धा बाद झाल्याने भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी निर्णायक अवस्थेत आली आहे. आता ऋषभ पंत आणि तळाच्या फलंदाजांवर भारतीय संघांची मदार आहे.
असं असलं तरी चौथ्या दिवशीच्या एका वेगळ्या प्रकाराची सध्या खूप चर्चा सुरु आहे. कसोटीच्या चौथ्या दिवशीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये इंग्लंडचे खेळाडू आपल्या बुटांच्या स्पाईक्सने चेंडू दाबत आहेत आणि ते स्पाईक्सने घासण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. दिग्गज खेळाडूंसह क्रिकेटप्रेमींनी याचे फोटो सोशल मीडियावर टाकत इंग्लंड टीमवर बॉल टेम्परिंगचे आरोप लावले आहेत.
INDIA vs ENGLAND : टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान, शेवटच्या दिवशी लॉर्ड्स कसोटीत चुरस
भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सहवागने यासंबंधित एक फोटो शेअर करताना विचारलं आहे की, ”काय होतंय? इंग्लंडच्या खेळाडूंचा चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रयत्न आहे की कोरोनाला रोखण्यासाठी उपाय?” माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानेही सोशल मीडियावर बॉल टॅम्परिंग? असा म्हणत प्रश्न उपस्थित केला आहे.
View this post on Instagram
भारताने दुसऱ्या डावात 6 बाद 181 धावा केल्या असून 154 धावांची आघाडी आहे. अंधूक सूर्यप्रकाशामुळे चौथ्या दिवशी खेळ लवकर थांबवण्यात आला तेव्हा ऋषभ पंत 14 आणि इशांत शर्मा 4 धावांवर खेळत होता. टीम इंडियाकडून पहिल्या डावातील शतकवीर के . एल. राहुल केवळ पाच धावा करत बाद झाला तर रोहित शर्मा 21 धावांवर बाद झाला.
भारतीय कर्णधार विराट कोहली देखील 20 धावांवर बाद झाल्यानं टीम इंडिया अडचणीत सापडली. त्यानंतर पुजारा आणि रहाणे यांनी दुसरे सत्र संयमी खेळी करत सावरले. दोघांनी 100 धावांची पार्टनरशीप केली. मार्क वूडनं पुजाराला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर रहाणे 61 धावांवर तर जाडेजा केवळ 3 धावा करुन बाद झाले. मार्क वूडने तीन तर मोईन अलीने दोन विकेट्स घेतल्या आहेत.
टीम इंडियानं पहिल्या डावात 364 धावा केल्या होत्या. केएल राहुलचं शानदार शतक आणि रोहित शर्माचं अर्धशतक तसेच विराट कोहली आणि रविंद्र जाडेजाच्या चांगल्या खेळीच्या बळावर भारतानं 364 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात इंग्लंडकडून अॅंडरसननं पाच तर मार्क वूड, रॉबिन्सननं दोन दोन विकेट्स घेतल्या होत्या.
तर इंग्लंडनं पहिल्या डावात कर्णधार ज्यो रुटच्या शानदार नाबाद 180 धावांच्या बळावर 391 धावा करत टीम इंडियावर 27 धावांची आघाडी घेतली होती. बेअरस्टोनं पहिल्या डावात 57 तर बर्न्सनं 49 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात टीम इंडियाकडून सिराजनं चार, इशांत शर्मानं तीन तर शामीनं दोन विकेट्स घेतल्या होत्या.