भारत-इंग्लंड सामन्यादरम्यान सट्टेबाजी, पुण्यात मैदानालगतच थाटलेला सट्ट्याचा अड्डा उद्ध्वस्त
भारत-इंग्लंड क्रिकेट मॅच सुरू असलेल्या एमसीए मैदानालगतच थाटलेला बुकिंचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात यश आलं आहे.ही टोळी मैदान परिसरात होती, तिथं सुरू असलेल्या मॅचचं मोबाईल आणि टीव्ही वर 6 ते 13 सेकंद उशिरा प्रक्षेपण व्हायचं. याचा फायदा घेऊन ते सट्टा लावत असायचे.
पुणे : भारत-इंग्लंड क्रिकेट मॅच सुरू असलेल्या एमसीए मैदानालगतच थाटलेला बुकिंचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात यश आलं आहे. ही टोळी मैदान परिसरात होती, तिथं सुरू असलेल्या मॅचचं मोबाईल आणि टीव्ही वर 6 ते 13 सेकंद उशिरा प्रक्षेपण व्हायचं. याचा फायदा घेऊन ते सट्टा लावत असायचे. पण पिंपरी चिंचवड पोलिसांनी मॅच सुरू असतानाच तीन ठिकाणी छापेमारी करून यांचा पर्दाफाश केला. गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला लागूनच असलेल्या घोरवडेश्वर डोंगर आणि बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत तर पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सट्टाबाजार सुरू होता. वाकड पोलिसांना याची खबर लागताच त्यांनी तीन पथकं नेमून यांचं बिंग फोडलं. एकूण 33 बुकींना बेड्या ही ठोकल्या, तसेच विदेशी नोटांसह 45 लाखांचा मुद्देमालही जप्त केला. तेंव्हा ही आंतरराज्यीय बुकींची टोळी असल्याचं निदर्शनास आलं.
इंग्लंड क्रिकेटचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. कसोटी आणि टी-ट्वेन्टी सामने खेळून एकदिवसीय सामन्यांसाठी तो पुण्यात आला आहे. गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हे सामने खेळले जातायेत. हे मैदान पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाला लागून असून, हे निर्मनुष्य ठिकाण आहे. याचाच फायदा घेण्यासाठी मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा अशा पाच ते सहा राज्यातील बुकी पुण्यात दाखल झाले.
विमान, रेल्वे तर काही स्वतःच्या आलिशान गाड्यांमधून ते सट्टाबाजार घडविण्यासाठी आले. यासाठी मैदानालगतच्या घोडावेश्वर डोंगर आणि बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची निवड केली तर एक काही बुकी पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाण मांडून होते. डोंगर आणि बांधकाम सुरू असलेल्या मैदानावर असलेले बुकी दुर्बिन आणि स्टील कॅमेरे घेऊन होते. मैदानावरील प्रत्येक बॉलवर काय घडतंय हे ते दुर्बिन आणि स्टील कॅमेऱ्याच्या साहाय्याने पाहत असत. मैदानावर सुरू असलेली मॅचचं मोबाईल आणि टीव्हीवर 6 ते 13 सेकंद उशिरा प्रक्षेपण व्हायचं.
हीच बाब लक्षात ठेऊन हे बुकी ऑनलाईन सट्टा लावायचे आणि पुढच्या बॉल वर काय घडणार हे त्यांना आधीच माहीत असल्यानं त्यांचं चांगलंच फावायचं. पण वाकड पोलिसांना याची खबर लागली. त्यांनी तीन पथकं बनवून एकाचवेळी तिन्ही ठिकाणी धाडी टाकल्या आणि त्यांचा पर्दाफाश केला. एकूण 33 बुकींना बेड्या ही ठोकल्या, तसेच विदेशी नोटांसह 45 लाखांचा मुद्देमाल ही जप्त केला. तेंव्हा ही आंतरराज्यीय बुकींची टोळी असल्याचं निदर्शनास आलं.