India Men Tour of England : धडाडत्या तोफेला संधी नाही, लाॅर्ड ठाकूर परतला, दोघांची कसोटीत एन्ट्री; टीम इंडियामधील चार सरप्राईज चेहऱ्यांची चर्चा
18 सदस्यीय संघाची कमान शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. गिलची कर्णधारपदी नियुक्ती भारतीय क्रिकेटमध्ये एका नवीन युगाची सुरुवात आहे.

India Men Tour of England : भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी 24 मे (शनिवार) रोजी भारतीय संघ आणि नवीन कसोटी कर्णधाराची घोषणा करण्यात आली. 18 सदस्यीय संघाची कमान शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर गिलची कर्णधारपदी नियुक्ती भारतीय क्रिकेटमध्ये एका नवीन युगाची सुरुवात आहे. फेब्रुवारी 2022 पासून भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहितसोबतच, त्याचे सहकारी विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांनीही कसोटी क्रिकेटला निरोप दिला आहे. आयपीएल 2025 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या साई सुदर्शन आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. करुण नायरची 2017 नंतर संघात वापसी झाली आहे.
मोहम्मद शमी, सरफराज खानला संधी नाही
करुण नायरचीही संघात निवड झाली आहे, जो बऱ्याच काळानंतर परतला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला फिटनेसशी संबंधित कारणांमुळे संघात स्थान मिळालेले नाही. वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दुल ठाकूरचेही कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. त्याच वेळी, श्रेयस अय्यर या संघाचा भाग नाही. तर सरफराज खानलाही स्थान मिळालेले नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुंबईतील मुख्यालयात संघ निवडीची बैठक झाली. या बैठकीला बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया आणि अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांनी भारतीय संघाची घोषणा केली. पत्रकार परिषदेत शिव सुंदर दास देखील उपस्थित होते.
इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिमन्यू ईश्वरन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
इंग्लंडमधील भारताचा कसोटी रेकॉर्ड तितकासा चांगला नाही
इंग्लंडच्या भूमीवर भारतीय संघाचा कसोटी रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. भारताने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर ६७ कसोटी सामने खेळले आहेत (1932-2022). या काळात त्यांनी फक्त 9 कसोटी सामने जिंकले आहेत, तर 36 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 22 सामने अनिर्णित राहिले. एमएस धोनीचा (2011-2014) इंग्लंडच्या भूमीवर कर्णधार म्हणून सर्वात वाईट विक्रम होता. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडच्या भूमीवर 9 पैकी फक्त एक कसोटी सामना जिंकला, तर सात सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. एक सामना अनिर्णित राहिला.
इतर महत्वाच्या बातम्या


















