भारत कसोटी मालिका जिंकणार नाही, दोन भारतीय खेळाडूंची भविष्यवाणी
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका येत्या 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे. मात्र भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंनी मालिका भारत जिंकणार नसल्याची भविष्यवाणी केली आहे.
लंडन : क्रिकेटप्रेमींची नजर सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेवर आहे. येत्या 1 ऑगस्टपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. जगभरातील क्रिकेटच्या जाणकारांनी या मालिकेबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. भारताची बाजू या मालिकेत भक्कम असल्याचं सर्वांकडून बोललं जात आहे.
भारताचं पारडं जड असल्याचं बोलंल जात असताना मात्र भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंनी मात्र वेगळा अंदाज व्यक्त केला आहे. भारताचा माजी जलद गोलंदाज जहीर खान आणि संघाबाहेर असलेल्या गौतम गंभीरने भारत-इंग्लंड यांच्या कसोटी मालिकेबाबत भविष्यवाणी केली आहे.
दोघांची भविष्यवाणी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी निराशजनक आहे. गौतम गंभीरच्या मते कसोटी मालिका इंग्लंड जिंकेल. तर जहीर खानच्या मते कसोटी मालिक 1-1 अशी अनिर्णित राहील. भारताने इंग्लंडमध्ये केवळ तीन वेळी मालिका आपल्या नावे केली आहे. राहुल द्रविडच्या नेतृत्वात 2007 मध्ये भारताने कसोटी मालिकेवर कब्जा केला होता.
गौतम गंभीरने म्हटलं की, इंग्लंडची गोलंदाजी त्यांची जमेची बाजू आहे. जलद गोलंदाज जेम्स अँडरसन भारताविरुद्ध नेहमीच घातक ठरला आहे. अनुभवी गोलंदाजांप्रमाणे अनुभवी फलंदाजांची तगडी फळी इंग्लंडकडे आहे. अॅलिस्टर कूक, जो रुट भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी ठरू शकतात. तसेच ऑलराउंडर बेन स्टोक्स मालिकेत मोठी भूमिका निभावू शकतो.
तर जहीर खानच्या मते, खेळपट्टी कशी असेल यावर सामन्यांचा निकाल अवलंबून असेल. मालिकेत काही सामने सपाट खेळपट्टीवर खेळवण्यात येतील. त्यामुळे गोलंदाजांना मोठी मेहनत करावी लागेल, असे सामने अनिर्णित राहण्याची शक्यता आहे. मालिकेतील तीन सामने अनिर्णित राहण्याची शक्यता आहे, तर दोन्ही संघ एक-एक सामना जिंकतील, असा अंदाज जहीरने व्यक्त केला आहे.