(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC Test Rankings: शार्दुल ठाकूरची कसोटी क्रमवारीत मोठी झेप, रोहित शर्मा, बुमराहलाही फायदा
ICC Test Rankings: इंटरनेशनल क्रिकेट कौन्सिलकडून जारी करण्यात आलेल्या कसोटी रँकिंगमध्ये भारताच्या रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूरला चांगलाच फायदा झाला आहे.
ICC Test Rankings: इंटरनेशनल क्रिकेट कौन्सिलकडून जारी करण्यात आलेल्या कसोटी रँकिंगमध्ये भारताच्या रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूरला चांगलाच फायदा झाला आहे. सोबतच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या रँकिंगमध्ये वाढ झाली आहे. दुसरीकडे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस वोक्सनं देखील कसोटी क्रमवारीत चांगलीच झेप घेतली आहे.
शार्दुलनं इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीमध्ये दोन डावात 57 आणि 60 धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्यानं कसोटी फलंदाजांच्या यादीत 79 व्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं ओव्हलवर चार विकेट्स घेतल्यानंतर या मालिकेत त्याच्या एकूण 18 विकेट्स झाल्या आहेत. तो आता कसोटी क्रमवारीत दहाव्या स्थानावरुन नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
तर इंग्लंडच्या वोक्सनं फलंदाजीमध्ये 87 व्या स्थानावर झेप घेतलीय तर गोलंदाजांच्या क्रमवारीत तो 23 व्या स्थानावर पोहोचला आहे. तो अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आता सातव्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिंसननं या मालिकेत 21 विकेट घेतल्या आहेत. तो गोलंदाजांच्या यादीत 33 व्या स्थानावर पोहोचला आहे.
रोहित शर्माला 800 हून अधिक गुण
शानदार फॉर्मात असलेला भारताचा सलामीवीर रोहित शर्मा फलंदाजांच्या यादीत 813 रेटिंग अंकांसह पाचव्या स्थानावर आहे. आपल्या कसोटी करिअरमध्ये रोहितनं पहिल्यांदाच 800 पेक्षा अधिक अंक प्राप्त केले आहेत. रोहित शर्मा भारताचा अकरावा खेळाडू आहे ज्याने कसोटीत आठशे पेक्षा अधिक प्वाईंट्स मिळवले आहेत.
भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत आतापर्यंत एकही सामना खेळू न शकलेल्या रविचंद्रन अश्विनच्या क्रमवारीत काहीही बदल झालेला नाही. तो गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
टीम रॅंकिंगमध्ये 126 गुणांसह न्यूझीलॅंडची टीम नंबर एकवर आहे तर 119 गुणांसह टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 108 गुणांसह तिसऱ्या तर इंग्लंड 107 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
फलंदाजांच्या यादीत शानदार फार्मात असलेला इंग्लंडचा कर्णधार जो रुट 903 अंकांसह नंबर एकवर आहे तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन हा 901 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स नंबर एक वर आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर नंबर एकवर आहे तर इंग्लंडचा बेन स्टोक दुसऱ्या तर भारताचा रविंद्र जाडेजा तिसऱ्या नंबरवर आहे.