(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistan Cricket Team : सलग चार पराभवाने चाचपडणाऱ्या पाकिस्तान संघामध्ये अखेर पहिला भूकंप झालाच; थेट राजीनामा आल्याने एकच खळबळ!
पाकिस्तान क्रिकेट संघाने क्रिकेटच्या महाकुंभात म्हणजेच भारतात होत असलेल्या विश्वचषकात 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Pakistan Cricket Team : 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात अभूतपूर्व राडा सुरु आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच असतानाच पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते इंझमाम उल हक यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. इंझमाम यांच्यावर अनेक खेळाडूंचा गैरफायदा घेतल्याचा आरोप होत आहे.
Inzamam Ul Haq has resigned as PCB Chief Selector. pic.twitter.com/c2lqfEMumF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 30, 2023
सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर इंझमाम उल हक यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 2023 मध्ये भारतात खेळल्या जाणार्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ अतिशय खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाने क्रिकेटच्या महाकुंभात म्हणजेच भारतात होत असलेल्या विश्वचषकात 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या स्पर्धेतील पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर संघाचे अनेक माजी खेळाडूही कर्णधार बाबर आझमवर तुटून पडले आहेत. पाकिस्तानच्या अनेक क्रिकेट तज्ञ आणि माजी खेळाडूंनी विश्वचषकातील संघाच्या खराब कामगिरीसाठी बाबर आझमला जबाबदार धरलं आहे. अगदी अनेक खेळाडूंनी सल्ले दिले आणि कर्णधार म्हणून इतर खेळाडूंची नावे सुचवली. बाबर सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा नियमित कर्णधार आहे.
दुसरीकडे, बाबर आझमचे खासगी व्हॉट्सअॅप चॅट लीक झाल्याचा दावा पाकिस्तानातील एका टीव्ही चॅनलने केला आहे. या दाव्यानुसार, बाबर आझमने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीचे सीओओ सलमान नसीर यांच्याशी चर्चा केली होती. आता पीसीबीने या प्रकरणी अधिकृत निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानी टीव्ही चॅनल आणि काही पत्रकार करत असलेले हे दावे चुकीचे असल्याचे पीसीबीचे म्हणणे आहे. बाबर आझमचे लीक झालेले व्हॉट्सअॅप चॅट बनावट असल्याचे सांगितले.
पीसीबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आणि पीसीबीचे सीओओ सलमान नसीर यांच्यातील लीक झालेली व्हॉट्सअॅप चॅट पूर्णपणे बनावट आहे. काही खोडकर लोकांनी त्यांच्या वाईट हेतूने त्याचा वापर केला आहे. बाबर आझमच्या व्हॉट्सअॅप चॅट लीक केल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांबाबत पीसीबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “त्यांना या वाहिन्या आणि पाकिस्तानच्या पत्रकारांशी काहीही देणेघेणे नाही आणि पीसीबीचे अध्यक्ष झका यांचा बाबर आझमशी काहीही संबंध नाही. "अश्रफ आणि सलमानसोबत व्हॉट्सअॅपवर कोणताही संवाद झालेला नाही." पीसीबीने पुढे लोकांना आवाहन केले आहे की, "या खोट्या अफवांकडे दुर्लक्ष करा आणि विश्वचषक खेळण्यासाठी भारतात गेलेल्या पाकिस्तान संघाला आणि कर्णधार बाबर आझमला पाठिंबा द्या."
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू वकार युनूस यानेही पाकिस्तानचा विद्यमान कर्णधार बाबर आझमचे समर्थन केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या