Gautam Gambhir on Sanju Samson : 4 सामने बाहेर, तरीही जिंकला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किताब...; संजूबाबत गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा, जिममध्ये नेमकं काय घडलं?
Sanju Samson T20 World Cup 2026 : संजू सॅमसनला आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले होते.

Gautam Gambhir on Sanju Samson : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याला आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 च्या सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतर झालेल्या पुनरागमनाने भारताच्या मोहिमेचा चेहरामोहराच बदलून टाकला. या निर्णयामागची खरी कहाणी आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने सांगितली आहे.
गौतम गंभीरने जिओहॉटस्टारवरील चर्चेत सांगितले की, आम्हाला संजूच्या क्षमतेवर सुरुवातीपासूनच पूर्ण विश्वास होता. त्यामुळेच त्यांनी टीम मॅनेजमेंटसमोर ठामपणे सांगितले होते की या केरळच्या विकेटकीपर-फलंदाजाला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये आणणे गरजेचे आहे.
टॉप-ऑर्डरमध्ये लय सापडत नव्हती....
स्पर्धेच्या सुरुवातीला भारताची टॉप-तीन फलंदाजांमध्ये अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये नव्हता. इशान किशन मात्र चांगली फलंदाजी करत होता, तर तिलक वर्मा संघर्ष करत होता. त्यामुळे पहिल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियाला योग्य लय पकडण्यात अडचणी आल्या. पण सुपर-8 टप्प्यात संजू सॅमसन संघात परतताच संपूर्ण चित्रच बदलले.
गंभीर म्हणाला की, “अनेक जण म्हणतील की आम्ही टॉप-ऑर्डरमधील तीन डावखुऱ्या फलंदाजांचा क्रम मोडण्यासाठी हा निर्णय घेतला. पण खरे कारण ते नव्हते. आम्हाला फक्त संघाला अधिक आक्रमक बनवायचे होते. गेल्या दीड वर्षांपासून आमची एकच विचारधारा आहे, मैदानावर उतरायचे आणि शक्य तितका विस्फोटक क्रिकेट खेळायचा.”
गंभीरने स्पष्ट केले की, संजूला संघात घेण्यामागचा हेतू ऑफ-स्पिनरविरुद्ध खेळणे नव्हता. “एक उत्कृष्ट फलंदाज कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध चांगले खेळू शकतो. आम्हाला फक्त पॉवरप्लेमध्ये जास्त आक्रमकता आणायची होती.”
जिममध्ये सांगितली प्लेइंग XI ची बातमी...
गंभीरने पुढे सांगितले की, संजूला संघात परत घेण्याची बातमी त्यांनी अगदी साध्या पद्धतीने दिली. “आम्ही दोघे जिममध्ये ट्रेनिंग करत होतो. तेव्हा मी त्याला सांगितले की तू झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहेस. त्याने फक्त ‘ठीक आहे’ असे म्हटले. आमचे नाते कोच-खेळाडू असे नाही, तर अगदी मोकळे आहे.”
निर्णायक सामन्यांत सुपरहिट कामगिरी
स्पर्धेच्या सुरुवातीला संजूला संघाबाहेर ठेवले गेले होते. नामिबिया आणि झिम्बाब्वेविरुद्ध त्याने 22 आणि 24 धावा केल्या होत्या. पण खरी जादू त्याने महत्त्वाच्या सामन्यांत दाखवली. सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 97, उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 89 आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 89 धावा करत त्याने भारताला तिसरे विजेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. या अप्रतिम कामगिरीमुळे संजूला स्पर्धेचा ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ पुरस्कारही मिळाला.
हे ही वाचा -




















