World Cup 2019 | बांगलादेशकडून अफगाणिस्तानचा 62 धावांनी पराभव
बांगलादेशनं अफगाणिस्तानला विजयासाठी 263 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र अफगाणिस्तानला अवघ्या 200 धावांपर्यंत मजल मारता आली. अर्धशतकी खेळी आणि 5 गडी टिपणाऱ्या शाकिब अल हसनला सामनावीर घोषित करण्यात आलं.
मुंबई : शाकिब अल हसननं अफगाणिस्तानचा निम्मा संघ गुंडाळून बांगलादेशला विश्वचषकात तिसरा विजय मिळवून दिला. या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा 62 धावांनी पराभव केला. बांगलादेशनं अफगाणिस्तानला विजयासाठी 263 धावांचं आव्हान दिलं होतं.
पण अफगाणिस्तानचा अख्खा डाव 200 धावांत गडगडला. शाकिब अल हसननं 29 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं. मुस्तफिजूर रहमाननं 32 धावांत दोन विकेट्स काढल्या.
त्याआधी, बांगलादेशने 50 षटकांत सात बाद 263 धावांची मजल मारली होती. मुशफिकूर रहिमनं 87 चेंडूत 83 धावांची खेळी केली. शाकिब अल हसननंही विश्वचषकातला सुपर फॉर्म कायम राखला, त्याने 51 धावांची खेळी उभारली. त्यानं सलामीच्या तमिम इक्बाल आणि मुशफिकूर रहिमच्या साथीनं अर्धशतकी भागिदाऱ्या साकारल्या.
त्यामुळे बांगलादेशला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमाननं सर्वाधिक तीन तर गुलबदीन नाइबनं दोन विकेट्स घेतल्या.
आजच्या विजयामुळे बांगलादेशने गुणतालिकेत 7 सामन्यात 7 गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे. अर्धशतकी खेळी आणि 5 गडी टिपणाऱ्या शाकिब अल हसनला सामनावीर घोषित करण्यात आलं.