Tanaji Sawant: 'मी वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवतोय, पण..' तानाजी सावंतांना पुतण्या धनंजय सावंतांचा निर्वाणीचा इशारा
दुसऱ्या पक्षाचे नगराध्यक्ष पाच हजारांनी निवडून आले आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष मात्र दोनशे मतांनी निवडून आलेत असेही धनंजय सावंत म्हणाले. या विधानामुळे वाद चव्हाट्यावर येण्याची चिन्हं आहेत.

Tanaji Sawant Vs Dhananjay Sawant: अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी ते आधी आचरणात आणावेत असं म्हणत पुतणे धनंजय सावंत यांनी काका आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत धनंजय सावंत यांनी हे वक्तव्य केलं. धृतराष्ट्राजवळ जसा एक संजय होता तसाच आजच्या नेत्यांजवळ संजय आहे. संजय बदलावा लागेल, असं म्हणत आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांना धनंजय सावंत यांनी सुनावलं.
तर मी सुद्धा हरिश्चंद्र राजा नाही
ते म्हणाले की, बोलायला भरपूर आहे, पण मी वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवतो. नाही, तर मी सुद्धा हरिश्चंद्र राजा नाही, असं म्हणत धनंजय सावंत यांनी इशारा दिला. नगरपालिका निवडणुकीत मी शांत राहिलो, तर जिल्ह्यातील दुसऱ्या पक्षाचे नगराध्यक्ष पाच हजारांनी निवडून आले आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष मात्र दोनशे मतांनी निवडून आलेत असेही धनंजय सावंत म्हणाले. या विधानामुळे काका पुतण्यांच्या मधील वाद चव्हाट्यावर येण्याची चिन्हं आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीआधीच सावंत कुटुंबातील संघर्ष उफाळून आला आहे.
काका पुतण्यात का बिनसले?
दरम्यान, माजी मंत्री तानाजी सावंत व त्यांचे पुतणे माजी जि. प. उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यात राजकीय अंतर निर्माण झाले आहे. स्वतंत्र चूल सावंतांनी मांडली असतानाच पुतण्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष म्हणून आपली स्वतंत्र फौज मैदानात उतरवत बंडाचे निशाण फडकावले आहे. तानाजी सावंत यांनी नगर परिषद स्वबळ आजमावले. नगराध्यक्ष त्यांचे निवडून आले तरी, नगरसेवकांचे बहुमत मात्र विरोधकांकडे गेले. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही सावंत यांनी स्वतंत्र उमेदवार दिले आहेत.
घरातूनच बंडाचे निशाण फडकावले
धनंजय सावंत यांनी परंडा मतदारसंघातील 5 गट व 11 गणातून आपल्या समर्थकांना अपक्ष म्हणून उतरवत घरातूनच बंडाचे निशाण फडकावले आहे. तानाजी सावंत मंत्री असताना परंडा मतदारसंघातील संपूर्ण कामकाजाची सूत्रे धनंजय सावंत यांच्याकडे होती. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काका-पुतण्यात काहीसे अंतर निर्माण झाल्याचे दिसून आले. आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून हे अंतर स्पष्ट झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























