(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2022: भारताच्या पदकसंख्येत आणखी भर; देशासाठी पदक जिंकून बर्मिंगहॅमध्ये तिरंगा फडकावलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी
CWG 2022 India Medal Winners: इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरु कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेच्या (Commonwealth Weightlifting Games 2022) पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत चार पदकं खिशात घातली.
CWG 2022 India Medal Winners: इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरु कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेच्या (Commonwealth Weightlifting Games 2022) पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत चार पदकं खिशात घातली आहेत. यामध्ये दोन सुवर्णपदकांसह दोन रौप्य पदकांचा समावेश आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून दरदिवशी पदकं खिशात घालत आहे. भारताचे वेटलिफ्टर दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. आज जिंकलेल्या चार पदकांमुळे भारताची पदकसंख्या 13 वर गेलीय.
राष्ट्रकुल स्पर्धेचा दुसरा दिवस-
1) संकेत महादेव सरगर
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकते महादेव सरगरनं भारताला सर्वात पहिले पदक मिळवून दिलं. या स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी त्यानं वेटलिफ्टिंग पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात स्नॅचमध्ये 113 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 135 किलो म्हणजे एकूण 248 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकलं
2) गुरुराज पुजारी
वेटलिफ्टर गुरुराजा पुजारीने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला दुसरं पदक मिळवून दिलं. त्यानं वेटलिफ्टिंग पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात 269 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकलं.
3) मीराबाई चानू
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू भारताला तिसरं पदक जिंकून देणारी वेटलिफ्टर ठरली. तिनं महिला वेटलिफ्टिंग 49 किलो गटात एकूण 201 किलो वजन उचलून देशासाठी सुवर्णपदक जिंकले. मीराबाईनं स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचललं.
4) बिंद्याराणी देवी
वेटलिफ्टर बिंदियारानी देवीनं महिलांच्या 55 किलो वजनी गटात भारतासाठी रौप्यपदक जिंकलंय. तिनं स्नॅचमध्ये 86 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 116 किलो म्हणजे एकूण 202 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकलं. फक्त एका किलोन तिचं सुवर्णपदक हुकलं.
राष्ट्रकुल स्पर्धेचा तिसरा दिवस-
5) जेरेमी लालरिनुंगा
जेरेमी लालरिनुंगा याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दुसरं सुवर्णपदक जिंकून दिलं. त्यानं वेटलिफ्टिंगच्या पुरूष 67 किलो गटात 300 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकलं. रौप्यपदक विजेत्या वायपावा लोन (293 किलो) पेक्षा सात किलो जास्त वजन उचलून तो चॅम्पियन बनला.
6) अचिंता शेउली
अचिंता शेउलीनं पुरुषांच्या 73 किलो वजनी गटात स्नॅच फेरीत 143 किलो आणि क्लीन अँड जर्क फेरीत 170 किलो वजन उचललं. अशाप्रकारे त्यानं एकूण 313 किलो वजन उचललं आणि भारताच्या खात्यात तिसरं सुवर्णपदक जमा केलं.
राष्ट्रकुल स्पर्धेचा चौथा दिवस-
7) सुशीला देवी
सुशीला देवी लिकमाबमनं ज्युदोच्या 48 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं. अंतिम फेरीत सुशीलाचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या मायकेला व्हिटबोईशी झाला, ज्यात सुशीला देवीनं विजय मिळवला.
8) विजय कुमार यादव
ज्युदोमध्ये विजय कुमार यादवनं भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या 60 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जोशुआकडून त्याला पराभव पत्करावा लागला. यानंतर त्याला रेपेचेज सामन्यांमध्ये संधी मिळाली आणि येथे त्यानं कांस्यपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतीत विजयनं सायप्रसच्या प्राटोचा 10-0 असा पराभव केला.
9) हरजिंदर कौर
भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरने महिलांच्या 71 किलो वजनी गटात एकूण 212 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकलं. हरजिंदरनं स्नॅचमध्ये 93 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 119 किलो वजन उचललं.
राष्ट्रकुल स्पर्धेचा पाचवा दिवस-
10) महिला लॉन बॉल्स संघ
लॉन बॉलच्या महिलांच्या चार स्पर्धेत भारतीय संघानं प्रथमच सुवर्णपदक जिंकलंय. लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया, रूपा राणी यांनी भारताला हं पदक मिळवून दिलंय. अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 17-10 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं.
11) पुरुष टेबल टेनिस संघ
पुरुषांच्या टेबल टेनिस संघाच्या अंतिम सामन्यात भारतानं सिंगापूरचा 3-1 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. शरद कमल, जी साथियान आणि हरमीत देसाई या त्रिकुटानं भारताला हे सुवर्ण मिळवून दिलं. येथे शरद कमलनं त्यांचा एकेरी सामना गमावला. परंतु साथियान आणि हरमीत यांनी आपापल्या एकेरी सामना आणि दुहेरीचा सामना जिंकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.
12) विकास ठाकूर
वेटलिफ्टर विकास ठाकूरनं वेटलिफ्टिंगच्या पुरुष 96 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकलं. विकासनं स्नॅचमध्ये 155 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 191 किलो वजन उचललं. त्यानं एकूण 346 किलो वजनासह दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
13) मिश्र बॅडमिंटन संघ
मिश्र बॅडमिंटन सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला मलेशियाकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला आणि रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा पराभव झाला. यानंतर ट्रीजा जॉली आणि गायत्री गोपीचंद या महिला जोडीचाही पराभव झाला. किदाम्बी श्रीकांतलाही पराभवाला सामोरे जावे लागले. एकेरी सामन्यात पीव्ही सिंधूनं तिचा सामना जिंकलाय.
हे देखील वाचा-
- CWG 2022 Day 6 Schedule: भारतीय बॉक्सरसह सौरव घोषाल पदक जिंकण्यासाठी सज्ज, पाहा आजचं संपूर्ण वेळापत्रक
- CM Eknath Shinde : योग्य संधी मिळाल्यास स्थानिक मैदानावरुनही जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील : मुख्यमंत्री
- CWG 2022, Medal Tally : पाचव्या दिवशी भारताच्या खिशात चार पदकं, दोन सुवर्ण पदकांसह दोन रौप्य पदकांवर कोरलं नाव