'अख्खं जग तुझ्यावर...'; MS धोनी अन् कपिल देव यांच्यावर योगराज सिंह संतापले, नेमकं काय म्हणाले?
Yograj Singh MS Dhoni and Kapil Dev: धोनी महान क्रिकेटर आहे, मी त्याचा आदर करतो, पण त्याने माझ्या मुलासोबत ते मी कधीही विसरणार नाही, असं योगराज सिंह म्हणाले.
Yograj Singh MS Dhoni and Kapil Dev: भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंहनी (Yograj Singh) पुन्हा एकदा एमएस धोनी (MS Dhoni) आणि कपिल देव (Kapil Dev) यांच्यावर टीका केली. योगराज सिंह यांनी एमएस धोनी आणि कपिल देव यांच्यावर राग व्यक्त केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर योगराज सिंह यांची चर्चा रंगली आहे.
मी एमएस धोनीला (MS Dhoni) कधीही माफ करणार नाही. धोनीने आरशात आपला चेहरा पाहावा. तो एक महान क्रिकेटर आहे, मी त्याचा आदर करतो, पण त्याने माझ्या मुलासोबत ते मी कधीही विसरणार नाही, असं योगराज सिंह म्हणाले. त्या माणसाने (एमएस धोनी) माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले. युवराज सिंह आणखी पाच वर्षे खेळू शकला असता, अशी योगराज सिंह यांनी टीका केली. तसेच युवराज सिंहसारखा खेळाडू तयार करुन दाखवा, असं आव्हान देखील योगिराज सिंह यांनी दिले.
युवराज सिंहला भारतरत्न द्या-
तुम्हाला आठवत असेल तर गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवाग देखील म्हटले होते की, युवराज सारखा प्लेयर पुन्हा होऊ शकत नाही. त्यामुळे कॅन्सर असताना देखील देशासाठी वर्ल्ड कप खेळल्याबद्दल भारताला त्याला भारतरत्न द्यावा, अशी मागणी योगराज सिंह यांनी केली आहे. मी आयुष्यात दोन गोष्टी कधीच केल्या नाहीत. पहिलं म्हणजे माझ्यासोबत चुकीचं करणाऱ्या लोकांना मी कधीच माफीनामा देत नाही अन् दुसरं म्हणजे मी त्यांना कधीच मिठी मारणार नाही, मग ते माझ्या कुटूंबातील असो वा माझी मुलं, असं योगराज सिंह यांनी म्हटलं.
Yograj Singh latest interview !
— Riseup Pant (@riseup_pant17) September 1, 2024
🎥 Zeeswitch#CricketTwitter #MSDhoni #IPL2025 pic.twitter.com/iUNBnwO8BG
कपिल देवबाबत काय म्हणाले?
भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर देखील योगराज सिंह यांनी टीका केली. महान कर्णधार कपिल देव यांना मी सांगितलं होतं, असे करुन ठेवेन की अख्ख लोक तुझ्यावर थुंकतील. आज युवराज सिंहकडे 13 ट्रॉफी आहेत आणि तुझ्याकडे फक्त 1 आहे, असंही योगराज सिंह म्हणाले.
युवराज सिंहची कारकीर्द-
युवराज सिंहने 3 ऑक्टोबर 2000 रोजी नैरोबी येथे केनियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि भारतीय संघासाठी एकूण 40 कसोटी, 304 एकदिवसीय सामने आणि 58 टी-20 सामने खेळले. 2007 T20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत तो भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू होता. युवराजने इंग्लिश वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात सहा षटकार मारले आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने 361 धावा केल्या आणि 15 विकेट घेतल्याबद्दल मालिका सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला. भारतासाठी युवराजने शेवटचा सामना 30 जून 2017 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध होता आणि मे 2019 मध्ये निवृत्ती जाहीर केली.
कॅन्सरवर केली मात-
युवराज सिंग 2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. त्याने या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेदरम्यान त्याला कॅन्सरसारख्या घातक आजाराने ग्रासले होते. वर्ल्ड कपनंतर युवराजने या आजाराबाबत खुलासा केला तेव्हा त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला. यानंतर युवराज सिंगच्या कॅन्सरवर बोस्टन आणि इंडियानापोलिसमध्ये उपचार करण्यात आले. मार्च 2012मध्ये त्याने कर्करोगासारख्या मोठ्या आजारावर मात केली आणि क्रिकेटच्या मैदानावर शानदार पुनरागमन केले.
संबंधित बातमी:
प्रीती पालने रचला इतिहास; पॅरालिम्पिकमध्ये पटकावले दोन कांस्य पदक, निषादचीही रौप्य कामगिरी