WTC 2025 Points Table : टीम इंडियाचा पराभव अन् पाकिस्तानच्या विजयानंतर बदलले WTC पॉइंट टेबल; फायनलची शर्यत झाली रोमांचक
WTC Points Table Updated News : बंगळुरू पाठोपाठ पुणे कसोटीत भारताला न्यूझीलंडकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
WTC 2025 Points Table IND vs NZ 2nd Test : बंगळुरू पाठोपाठ पुणे कसोटीत भारताला न्यूझीलंडकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अशा प्रकारे भारतीय संघाने 3 सामन्यांची मालिका गमावली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने कसोटी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता आणि आता दुसऱ्या कसोटीत 113 धावांनी धूळ चारून नवा इतिहास रचला होता. खरं तर, भारतीय संघाला 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. याआधी टीम इंडियाला 2012 साली इंग्लंडकडून कसोटी मालिका गमवावी लागली होती.
पुणे कसोटीत प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात 259 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 156 धावांत गडगडला. यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या आणि यजमान टीम इंडियाला विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ दुसऱ्या डावात केवळ 235 धावाच करू शकला.
New Zealand stir up the race to the #WTC25 Final with a historic win over India in Pune 👀 #INDvNZ | Read on 👇https://t.co/0QYbooJJlB
— ICC (@ICC) October 26, 2024
कसोटी मालिका गमावण्याबरोबरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात WTC च्या गुणतालिकेत भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडने गुणतालिकेत वाढ केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर टीम इंडिया पुणे टेस्टपूर्वीही पहिल्या क्रमांकावर होती आणि आजही पहिल्या क्रमांकावर आहे. होय, पण आता भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पीसीटी अंतर खूपच कमी झाले आहे. पुणे कसोटीपूर्वी भारतीय संघाचा पीसीटी 68.06 होता, जो या सामन्यातील पराभवाने आता 62.82 वर आला आहे. तर ऑस्ट्रेलियाचे पीसीटी फक्त 62.50 आहे, कारण ऑस्ट्रेलियाने मार्च 2024 पासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
दरम्यान, इतर संघांबद्दल बोलायचे झाल्यास, भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंका संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा पीसीटी सध्या 55.56 आहे. मालिका जिंकल्यानंतर, न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले आणि 50.00 पीसीटीसह चौथ्या स्थानावर कब्जा केला. दक्षिण आफ्रिकेचा संघ एक स्थान गमावून आता पाचव्या स्थानावर घसरला आहे.
दुसरीकडे, पाकिस्तान संघ दीर्घ कालावधीनंतर मायदेशात कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. ज्यामुळे त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फायदा झाला. पाकिस्तानचा संघ आता सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा पीसीटी 33.33 आहे. त्याच वेळी, इंग्लंड संघ 40.79 च्या पीसीटीसह सहाव्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तानने मालिका जिंकल्यानंतर बांगलादेशचा संघही एका स्थानाने घसरून आठव्या स्थानावर आला आहे, तर वेस्ट इंडिजचा संघ सर्वात खालच्या स्थानावर म्हणजेच नवव्या स्थानावर गेला आहे.