वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनपूर्वी टीम इंडियाला तीन धक्के, आता अय्यर दुखापतग्रस्त
लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून दोन्ही संघांमधील विजेतेपदाची लढत होणार आहे.
World Test Championship Final : जूनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावस्कर मालिकेत पराभवूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जागा मिळवली होती. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधीच टीम इंडियाच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. आतापर्यंत टीम इंडियाला तीन मोठे धक्के बसले आहेत. दुखापतीमुळे हे तिन्ही खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये खेळू शकत नाहीत. आशिया कप आणि विश्वचषकातही खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला मुकणार आहे. त्याशिवाय ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे याआधीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. हे तिन्ही खेळाडूंची रिप्लेसमेंट मिळणं कठीण आहे, त्यामुळे हा टीम इंडियाला मोठा झटका आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून दोन्ही संघांमधील विजेतेपदाची लढत होणार आहे.
श्रेयस अय्यर आयपीएलच्या अखेरीस काही सामन्यासाठी उपलब्ध असू शकतो, अशी चर्चा होती. मात्र, सर्जरी करणार असल्यामुळे संपूर्ण हंगमात अय्यर खेळणार नाही. तसेच जून महिन्यात होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही अय्यर खेळू शकणार नाही. हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरच्या पाठिची सर्जरी करण्यात येणार आहे. त्यासाठी अय्यर लवकरच परदेशात जाणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तीन महिन्याचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर क्रिकेटचा सराव सुरु करु शकतो. दुखापतीमुळे आधी जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहेत. त्याशिवाय ऋषभ पंतही आणखी सहा ते सात महिने मैदानावर परतणार नाही. या दोन धक्क्यातून टीम इंडिया सावरत नाही, तोपर्यंत श्रेयस अय्यरचा मोठा झटका बसला आहे. अय्यर सर्जरी करण्यासाठी परदेशात जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिकेतील अखेरचा कसोटी सामना दुखापतीमुळे श्रेयस अय्यर खेळला नव्हत. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातही श्रेयस अय्यरला पाठदुखीचा त्रास झाला होता, त्यामुले तो टीम इंडियाच्या बाहेर गेला होता. आता पुन्हा एखदा तीच दुखापत बळावली आहे.
मागील सहा ते सात महिन्यापासून जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टीम इंडियामध्ये नाही. तर ऋषभ पंत याचा डिसेंबर मध्ये अपघात झाला होता. तो थोडक्यात बचावला. पण पुढील सहा ते सात महिने तो क्रिकेट खेळू शकत नाही. त्यातच आता अय्यरच्या दुखापतीने चिंता वाढवली आहे. आता आयपीएलमध्ये आणखी एखाद्या खेळाडूला दुखापत झाली नाही, म्हणजे मिळवले. कारण, आता दुखापतीमुळे टीम बाहेर गेलेल्या खेळाडूंची रिप्लेसमेंट मिळणे कठीण आहे.