Women's IPL Auction 2023 Live : लिलावाच्या पहिल्या सेटमध्ये हरमनप्रीत, स्मृतीसारख्या दिग्गजांना मिळाला संघ, पाहा संपूर्ण यादी
WPL 2023 Auction Live : महिला प्रीमियर लीग लिलावाच्या पहिल्या सेटमध्ये एकूण 6 खेळाडूंची विक्री झाली. यामध्ये भारतीय कर्णधार हरमनप्रीत आणि स्मृती अशा खेळाडूंचा समावेश होता.
Smriti Mandhana and Harmanpreet kaur in IPL : महिला प्रीमियर लीग (WPL 2023) म्हणजेच महिला आयपीएलचा लिलाव सध्या सुरू असून पहिल्या सेटमधील खेळाडूंचे संघही निश्चित झाले आहेत. या लिलावाच्या पहिल्या सेटमध्येच भारतासह जगातील काही अव्वल महिला क्रिकेटपटूंची नावं समोर आली असून विविध फ्रँचायझींनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात बोलीही लावली आहे.
WPL लिलावाच्या पहिल्या सेटमध्ये एकूण 6 खेळाडूंची विक्री झाली आहे, त्यापैकी 3 खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विकत घेतले आहेत, तर 1-1 खेळाडूंना मुंबई, गुजरात आणि यूपी संघाने आपल्या संघात समाविष्ट केलं आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने पहिल्या सेटमध्ये एकही खेळाडू विकत घेतला नाही. पहिल्या सेटमध्ये कोणत्या संघांनी कोणत्या खेळाडूंना विकत घेतलं ते पाहूया...
बंगळुरूने आपल्या संघात स्मृती मंधाना, सोफी डिव्हाईन आणि एलिस पेरी या दिग्गज खेळाडूंना सामाविष्ट केलं आहे. त्याचबरोबर हरमनप्रीत कौरला मुंबईने, सोफी एक्लेस्टोनला यूपीने आणि अॅशले गार्डनरला गुजरातनं निवडलं आहे.
स्मृती मंधाना - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सर्वात पहिली खेळाडू स्मृती मंधानाच्या रुपात विकत घेतली. 3.40 कोटी रुपयांमध्ये स्मृतीला संघात सामिल केलं. जी संघासाठी कर्णधार देखील बनू शकते. स्मृती ही डावखुरी सलामीवीर फलंदाज असून तिला टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाचा अनुभवही आहे.
हरमनप्रीत कौर - मुंबई इंडियन्स
भारतीय संघाची कर्णधार असलेली हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने 1.80 कोटींमध्ये घेतले असून ती मुंबईचे कर्णधारपदही सांभाळू शकते यात शंका नाही.
महिला प्रीमियर लीग लिलावामधील सर्व फ्रँचायझींच्या पर्समध्ये जास्तीत जास्त 12 कोटी रुपये उपलब्ध आहेत. प्रत्येक फ्रँचायझीला किमान 9 कोटी रुपये खर्च करावे लागतील. या रकमेत संघाला किमान 15 आणि जास्तीत जास्त 18 खेळाडू खरेदी करावे लागतील. प्रत्येक फ्रँचायझी त्यांच्या संघात जास्तीत जास्त 6 परदेशी खेळाडूंचा समावेश करू शकते. या लिलावात एकूण 409 खेळाडू सहभागी होत असून त्यात 246 भारतीय आणि 163 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावात 163 परदेशी खेळाडूंपैकी 8 सहयोगी देशांचे खेळाडूही सहभागी होणार आहेत.
हे देखील वाचा-