IND vs AUS 3rd test : बॉर्डर गावस्कर मालिकेत महत्त्वाचा बदल, तिसऱ्या टेस्ट मॅचचं ठिकाण बदललं, 'या' मैदानात होणार सामना
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 कसोटी सामन्यांची मालिका सुरु असून पहिला सामना नुकताच भारताने जिंकला आहे.
IND vs AUS, 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर (Border Gavaskar Series) मालिका सुरु असून पहिला सामना नुकताच भारताने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता मालिकेत दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार असून त्यापूर्वी तिसऱ्या सामन्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तिसरा कसोटी सामना जो धर्मशाला येथील मैदानात होणार होता तो आता इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
🚨 JUST IN: The venue for the third Test of the Border-Gavaskar Trophy series has been changed.
— ICC (@ICC) February 13, 2023
Details ⬇️#INDvAUS | #WTC23 https://t.co/E7laKXltZH
'या' कारणामुळे सामन्याचं ठिकाण बदललं
बीसीसीआयने (BCCI) सध्या सुरु असलेल्या या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील स्थळ बदलण्याबाबतची माहिती दिली. ज्यामुळे आता हा सामना 1 मार्चपासून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. सुरुवातीला धर्मशाला येथील क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार होता. पण धर्मशाला येथील या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (HPCA) मधील खेळपट्टीच्या समस्यांमुळे सामन्याचं ठिकाण बदलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, "हिमाचल प्रदेशातील कडाक्याच्या हिवाळ्याच्या परिस्थितीमुळे, आउटफिल्डमध्ये पुरेसं गवत नाही आणि खेळपट्टी खेळण्यायोग्य होण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्यामुळे हे ठिकाण बदलण्यात येत आहे."
टीम इंडिया पुन्हा इंदूरच्या मैदानात उतरणार
दरम्यान काही दिवसांपूर्वीच इंदूरच्या मैदानात भारताने सामना खेळला असून आता पुन्हा एकदा या ठिकाणी टीम इंडिया उतरणार आहे. दरम्यान 2017 मध्ये धर्मशाला येथे एकमेव कसोटी सामना खेळला गेला होता. योगायोगाने तोही सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता. दोन्ही देशांदरम्यान 2016-17 च्या मालिकेतील ही अंतिम कसोटी भारताने जिंकली होती. त्या विजयासह भारताने मालिका 2-1 ने जिंकली आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी देखील जिंकली होती. दरम्यान सध्या विचार केल्यास नागपुरात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवून भारताने सध्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (17 फेब्रुवारी) दिल्लीत खेळला जाणार आहे.
सलामीच्या सामन्यात भारताचा दमदार विजय
नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (VCA Cricket Stadium) खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (India vs Australia 1st Test) भारताने एका मोठ्या आणि दमदार विजयाची नोंद केली. भारताने हा सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकाने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
हे देखील वाचा-