India Tour of Ireland 2022: व्हीव्हीएस लक्ष्मणची टीम इंडियाच्या प्रशिक्षकदी निवड होण्याची शक्यता, राहुल द्रविडचं काय?
VVS Laxman to Coach India: मायदेशात दक्षिण आफ्रिकेशी (IND Vs SA) पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आयर्लंडचा दौरा करणार आहे.
VVS Laxman to Coach India: मायदेशात दक्षिण आफ्रिकेशी (IND Vs SA) पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आयर्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्यात भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणची (VVS Laxman) भारतीय संघाच्या प्रशिक्षकदी निवड होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, त्यानंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचं (Rahul Dravid) काय होणार? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
विशेष म्हणजे, आयपीएलनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी टी-20 मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांना विश्रांती दिली जाऊ शकते. दरम्यान, भारतीय संघ इंग्लंड दौरा करणार आहे. या दौऱ्यात त्यांना ताजेतवानं पाठवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. त्यामुळं टीम इंडियाचे दोन संघ तयार करण्यात येणार आहे. एक संघ इंग्लड दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी राहुल द्रविड यांच्यावर सोपवण्यात आलीय. तर, दुसरा संघ दक्षिण आफ्रिकेशी टी-20 मालिका खेळल्यानंतर आयर्लंडचा दौरा करेल, या दौऱ्यात व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभळताना दिसतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
टीम इंडियाचा चार वर्षानंतर आयर्लंड दौरा
टीम इंडियाने यापूर्वी 2018 मध्ये आयर्लंडचा दौरा केला होता. या दौऱ्यातही दोन्ही संघांत दोन सामने खेळवण्यात आले होते. दोन्ही सामन्यात भारताचाच विजय झाला होता. दरम्यान याआधी 2007 मध्ये भारतीय संघाने पहिल्यांदा आयर्लंडचा दौरा केला होता. त्यावेळी दोन्ही संघांमध्ये एकमेवर टी-20 सामना झाला होता, ज्यात भारताने 9 विकेट्सनी विजय मिळवला होता. भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन वनडे सामने देखील झाले होते. या सर्व सामन्यात भारताचा एकतर्फी विजय झाला होता.
हे देखील वाचा-