Umesh Yadav : उमेश यादववर दु:खाचा डोंगर, वडील तिलक यादव यांचं निधन
Umesh Yadav : उमेशने पोलिस दलात भरती व्हावे असे तिलक यादव यांना वाटत होते.
Umesh Yadav's father Tilak Yadav Dies : ऑस्ट्रेलियाविरोधात सुरु असलेल्या चार सामन्याच्या बॉर्डर गावस्कर मालिकेत भारतीय संघाचा भाग असलेल्या उमेश यादव याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादव याचे वडील तिलक यादव यांचं आज निधन झालं. ते 74 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून तिलक यादव आजारी होते. नागपूरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं समोर आल्यानंतर त्यांना घरी आणण्यात येणार होतं, मात्र त्यापूर्वीच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तिलक यादव हे मूळचे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते वलनी कोळसा खाणीत निवृत्त कर्मचारी होते. ते नोकरीच्या शोधात नागपुरात आले होते. कोळसा खाणीत नोकरी मिळाल्यानंतर ते नागपूरजवळील खापरखेडी येथे आले आणि तेथे राहू लागले. तिलक यादव यांनी देशाला उमेश यादव याच्यासारखा प्रतिभावंत खेळाडू दिला. उमेश यादवशिवाय तिलक यादव यांची दोन मुले आहे आणि एक मुलगी आहे. कमलेश आणि रमेश अशी दुसऱ्या दोन मुलांची नावे आहेत. तिलक वर्मा यांच्यावर नागपूरमधील कोलार येथे अंतिम संस्कार झाले.
उमेशने पोलिस दलात भरती व्हावे असे तिलक यादव यांना वाटत होते. वडिलांच्या इच्छेनुसार उमेश यादवने तसा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. टेनिस बॉलने क्रिकेट खेळणाऱ्या उमेशला रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यानंतर त्याने भारतीय संघातही पदार्पण केले. विदर्भाच्या संघाच्या खेळाडूने टीम इंडियात स्थान मिळवणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. त्याला विदर्भ एक्स्प्रेस म्हणूनही ओळखलं जातं. ऑस्ट्रेलियाविरोधात पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात उमेश यादव याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले नव्हते. मिळालेल्या वृत्तानुसार, वडिलांच्या निधनानंतर उमेश यादव नागपूरला परतला आहे. सर्व विधी झाल्यानंतर तो टीम इंडियासोबत जोडला जाणार आहे.
Umesh Yadav's father passed away, condolences to whole family.
— Johns. (@CricCrazyJohns) February 23, 2023
देशांतर्गत क्रिकेटमध्ये उमेश यादव याने विदर्भ क्रिकेट संघाकडून खेळण्यास सुरुवात केली आहे. वेग आणि अचूक टप्प्यामुळे उमेश यादव याने अल्पवधीतच आपलं नाव कमावलं. उमेश यादवने दमदार कामगिरीच्या जोरावर 2010 मध्ये भारीय संघात स्थान पटकावलं. उमेश यादव गेल्या काही दिवसांपासून कसोटी संघाचा अविभाज्य घटक आहे. उमेश यादवने 54 कसोटी, 75 वनडे आणि 9 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 165 विकेट, वनडेत 106 आणि टी20 मध्ये 12 विकेट घेतल्या आहेत.