World Cup इतिहासात फक्त 4 वेळा 400 पेक्षा जास्त धावा, टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर
चौकार,षटकारांच्या आतषबाजीबरोबर विकेट अन् बरेच विक्रम होतात. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा कोणत्या संघाने उभारल्यात?
Highest Totals in World Cup History : भारतात होणारी विश्वचषक स्पर्धा पाच ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. प्रत्येक विश्वचषकात अनेक विक्रम मोडले जातात, काही नवे विक्रमही होतात. चौकार,षटकारांच्या आतषबाजीबरोबर विकेट अन् बरेच विक्रम होतात. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा कोणत्या संघाने उभारल्यात? 400 पेक्षा जास्त धावा कोण कोणत्या संघाने उभारल्या. त्यासह इतर सर्व माहिती जाणून घेऊयात...
5. श्रीलंका (Sri Lanka)-
1996 च्या विश्वचषकात श्रीलंका संघाने केनियाविरोधात धावांचा डोंगर उभारला होता. श्रीलंकेच्या फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता. 50 षटकात श्रीलंका संघाने पाच विकेटच्या मोबदल्यात 398 धावा चोपल्या होत्या. श्रीलंकासाठी अरविंदा डी सिल्वा (145), अर्जुन रणतुंगा (75), असंका गुरुसिन्हा (84) यांनी वादळी फलंदाजी केली होती.
4. दक्षिण अफ्रिका (South Africa) -
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आतापर्यंत भलेही विश्वचषक जिंकला नसेल, पण या संघाला कमकुवतही म्हटले जात नाही. 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला होता. वेस्ट इंडिजविरोधात दक्षिण आफ्रिका संघाने पाच विकेटच्या मोबदल्यात 408 धावा उभारल्या होत्या. कर्णधार एबी डी व्हिलियर्सने अवघ्या 66 चेंडूमध्ये नाबाद 162 धावा चोपल्या होत्या.
3. दक्षिण अफ्रिका (South Africa) -
विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या संघामध्ये दक्षिण अफ्रिका (South Africa) चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2015 च्या विश्वचषकात आयर्लंड विरोधातही आफ्रिकीच्या फलंदाजांनी वादळी खेळी केली होती. दक्षिण अफ्रिका (South Africa) संघातील फलंदाज आयर्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडले होते. आफ्रिकन संघाने निर्धारित 50 षटकात 411 धावा ठोकल्या होत्या. कॅनबराच्या मैदानावर हाशिम अमला (159) आणि फाफ डु प्लेसिस (109) यांनी शतकी खेळी केली होती.
2. भारत (India) -
दोन वेळच्या विश्वविजेता टीम इंडिया या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2007 च्या विश्वचषकात भारताची सुरुवात अतिशय खराब झाली होती. साखळी फेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. पण बरमूडाविरोधातील सामन्यात टीम इंडियाने विक्रम केला. भारताने बरमूडाची गोलंदाजी फोडून काढली होती. भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 413 धावा फलकावर लावल्या होत्या. या सामन्यात वीरेंद्र सहवागने 87 चेंडूवर 114 धावा चोपल्या होत्या. त्याशिवाय सौरव गांगुली (89), युवराज सिंह (83), आणि सचिन तेंडुलकर (57) यांनी वादळी अर्धशतके ठोकली होती.
1. ऑस्ट्रेलिया (Australia) -
विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ असलेला ऑस्ट्रेलिया या यादीत पहिल्या स्थानावर आहे. पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने पर्थच्या मैदानावर 417 धावांचा डोंगर उभारला होता. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरोधात 50 षटकात 417 धावा चोपल्या होत्या. डेविड वॉर्नरने 19 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 178 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने केलेल्या 417 धावा आजही विश्वचषकातील सर्वाधिक धावा आहेत.