Team india Captain : रोहित शर्मा होणार टी-20चा कॅप्टन, वन-डेच्या कर्णधारपदवरही चर्चा
Team india Captain : रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या टी-20 संघाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालेय.
Team india Captain : रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या टी-20 संघाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालेय. इनसाइड स्पोर्ट्सने बीसीसीआयच्या सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्माकडे टी-20 सोबत एकदिवसीय संघाचेही नेतृत्व देण्यात येणार आहे. टी-20 आणि एकदिवसीय सामन्यासाठी वेगवेगळा कर्णधार ठेवण्यास एकमत झालं नाही. सिनिअर सदस्यानुसार, दोन्ही संघाच्या कर्णधारपदावर एकच व्यक्ती असायला हवा. त्यामुळे रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाचं नेतृत्वही मिळण्याची शक्यता आहे. विराट कोहली कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम राहणार आहे. निवड समिती पुढील आठवड्यात याबाबतची घोषणा करणार आहे. न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यावर मर्यादीत षटकाच्या भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे दिली जाणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, BCCI अधिकाऱ्यांनी तिन्ही फॉर्मेटसाठी वेगवेगळे कर्णधारपद करणार असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. टी-20 आणि एकदिवसीय संघासाठी एक कर्णधार असावा, असं मत निवड समितीचं आहे. त्यातच विराट कोहली टी-20 विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार आहे. वर्कलोडचं कारण देत विराट कोहलीनं टी-20 संघाचं कर्णधारपद सोडलं आहे. विराट कोहलीनं सोशल मीडियावरही याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला की 'गेल्या काही वर्षांपासून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्णधारपदही सांभाळत आहे. वर्कलोड जास्त होत आहे. वन-डे आणि कसोटी कर्णधारपदावर लक्ष देण्यासाठी टी-20 संघाचं कर्णधारपद सोडत आहे. टी-20 मध्ये फक्त एक फलंदाज म्हणून खेळत राहिल.'
वर्ल्डकपनंतर न्यूझीलंडचा भारत दौरा -
टी-20 वर्ल्डकपनंतर न्यूझीलंड भारताच्या दौऱ्यावर येत आहे. यामध्ये तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी जयपूरमध्ये पहिला टी-20 सामना होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी रांची येथे दुसरा, 21 नोव्हेंबर रोजी कोलकातामध्ये तिसरा सामना होणार आहे. त्यानंतर 25 ते 29 नोव्हेंबरपर्यंत कानपूरमध्ये पहिला कसोटी सामना होणार आहे. तर 3 ते 7 डिसेंबरदरम्यान दुसरा कसोटी सामना होणार आहे.
2023 पर्यंत दोन वर्ल्डकप
2023 पर्यंत दोन विश्वचषक होणार आहेत. 2022 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रोलियात टी-20 वर्ल्डकप होणार आहे. 2023 मध्ये एकदिवसीय सामन्याचा विश्वचषक सामना होणार आहे. दोन मोठ्या स्पर्धेपूर्वी रोहित शर्माला संघ बांधणीसाठी वेळ मिळेल. ऑस्ट्रेलियातील मोठी मैदानं पाहाता रोहित शर्मा आपला चांगला संघ तयार करेल. त्यासोबतच रोहित शर्माला मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा अनुभव आहे, त्याचाही भारतीय संघाला फायदा होणार आहे.
कर्णधार म्हणून रोहित शर्माचं रेकॉर्ड जबरदस्त –
कर्णधार म्हणून रोहित शर्माचं रेकॉर्ड जबरदस्त आहे. 19 सामन्यात रोहित शर्मानं भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी भारतीय संघानं 15 विजय मिळवले आहे. तसेच आयपीएलमध्ये आपल्या संघाला रोहित शर्मानं 59.68 टक्के सामने जिंकून दिलेत. पाच वेळा चषकावर नाव कोरणारा, रोहित शर्मा आयपीएलमधील एकमेव कर्णधार आहे.
राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक –
माजी खेळाडू राहुल द्रविड भारताचा मुख्य प्रशिक्षक होणार आहे. द्रविडबद्दलची लवकरच घोषणा केली जाणार आहे. टी-20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यांनतर राहुल द्रविडकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.