Jalindar Supekar: जालिंदर सुपेकरांनी जामीनासाठी 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप, पुण्याच्या सावकाराच्या वकिलाचा दावा
Jalindar Supekar news: हगवणेंचा नातेवाईक जालिंदर सुपेकरांवर आणखी एक खळबळजनक आरोप, तुरुंगातील कैद्याकडून 500 कोटी रुपये मागितले. नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवडांचा आरोप

Pune crime news: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या काळ्या कारनाम्यांचे किस्से आता बाहेर येत आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपये मागितल्याचा आरोप काल केला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक (कारागृह) (Special IG Prisons) या पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी अमरावती येथील कारागृहात असणाऱ्या नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्याकडून जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी केला आहे. यासंदर्भात आपण नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्याचेही त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.
मी सुरुवातीपासून या केसमध्ये काम पाहतोय. या केसमध्ये रिमांडपासून बराच भ्रष्टाचार झाला आहे. गायकवाड यांचे बँक लॉकर्स, सोनं आणि रोख रक्कम जप्त करताना जालिंदर सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 100 ते 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी केला. नानासाहेब आणि गणेश गायकवाड येरवाड्यातून अमरावती जेलमध्ये वर्ग केले होते. अमरावतीला वर्ग केल्यानतंर जालिंदर सुपेकर जेलचे उपमहानिरीक्षक असताना त्यांनी 2024 मध्ये जेलमध्ये भेट दिली तेव्हा नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांना धमकावले होते. या दोघांना सुपेकर यांनी मारहाणही केली. मी तुम्हाला जामीन मिळवून देतो, मला 500 कोटी रुपये द्या. हे सर्व मीच केले आहे, मीच तुम्हाला अडकवले आहे. तुम्ही मला पैसे द्या, मी पुढच्या व्यक्तींना पैसे देऊन तुम्हाला बाहेर काढून देतो. नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी जालिंदर सुपेकर यांनी दिल्याचा आरोप ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी केला.
जालिंदर सुपेकर यांनी अमरावती कारागृहातील मिराशे, भोसले या अधिकाऱ्यांना गायकवाड पिता-पुत्राला टॉर्चर करायला सांगितले होते. मात्र, या पोलीस कर्मचाऱ्यांनी तसे केले नाही म्हणून सुपेकर यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन अमरावती कारागृहातील पाच ते सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. सोलापूरच्या एका कैद्याने जेलमध्ये नानासाहेब गायकवाड यांच्या गळ्यावर पत्र्याने वार केला होता. आम्ही याबाबत गुन्हा दाखल केला होता, असे वकील निवृत्ती कराड यांनी म्हटले.
आणखी वाचा























