T20 World Cup 2024 WI vs NZ: वेस्ट इंडिजचा सलग तिसरा विजय, न्यूझीलंडचं आव्हान जवळपास संपुष्टात, एका निर्णयाने केला घात!
T20 World Cup 2024 WI vs NZ: शेरफेन रदरफोर्ड आणि अल्झारी जोसेफ यांनी वेस्ट इंडिजच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
T20 World Cup 2024 WI vs NZ: टी-20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024 ) आज न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज (WI vs NZ) यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडचा 13 धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजचा हा सलग तिसरा विजय ठरला. तर या पराभवासह न्यूझीलंडचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
शेरफेन रदरफोर्ड आणि अल्झारी जोसेफ यांनी वेस्ट इंडिजच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. रदरफोर्डने 39 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 68 धावा केल्या आणि अल्झारीने सर्वाधिक 4 बळी घेतले. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी अजिबात योग्य ठरला नाही. याच निर्णयामुळे न्यूझीलंडचा घात झाल्याचे बोलले जात आहे.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 9 बाद 149 धावा केल्या. मात्र, किवी गोलंदाजांनी सुरुवातीलाच वेस्ट इंडिजचा मुकाबला केला आणि 30 धावांच्या स्कोअरवर 5 विकेट्स घेतल्या. पण इथून शेरफेन रदरफोर्डने शानदार खेळी करत वेस्ट इंडिजला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले, जे त्यांच्यासाठी विजयी धावसंख्या ठरले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 20 षटकांत 136/9 अशी धावसंख्या गाठता आली. वेस्ट इंडिजकडून उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. संघाकडून अल्झारी जोसेफने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. याशिवाय फिरकीपटू गुडकेश मोतीने 3 विकेट्स घेतल्या. उर्वरित 1-1 असे यश अकिल हुसेन आणि आंद्रे रसेल यांना मिळाले.
West Indies pull off an incredible win against New Zealand in Trinidad to book their place in the second round of #T20WorldCup 2024 👏 #WIvNZ | 📝: https://t.co/fFLN48Dsx6 pic.twitter.com/HLeJaojLoo
— T20 World Cup (@T20WorldCup) June 13, 2024
न्यूझीलंडकडून कोण खेळलं?
दीडशे धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडला फारशी सुरुवात झाली नाही. डेव्हॉन कॉनवे आणि फिन ऍलन यांनी पहिल्या विकेटसाठी 20 धावांची भागीदारी केली, जी तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कॉनवेच्या विकेटसह संपुष्टात आली. कॉनवेने 8 चेंडूत केवळ 05 धावा केल्या. ॲलनने 23 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 26 धावा केल्या. विल्यमसनला केवळ 01 धावा करता आल्या. त्यानंतर 9व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रचिन रवींद्र बाद झाला, ज्यामुळे न्यूझीलंडची चौथी विकेट पडली. रचिनने 13 चेंडूत केवळ 10 धावा केल्या. ग्लेन फिलिप्नने न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा केल्या. फिलिप्सने 33 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 40 धावांची खेळी केली. अखेरीस, मिचेल सँटनर 12 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 21 धावांवर नाबाद राहिला परंतु संघाला विजय मिळवून देण्यात ते यशस्वी ठरला नाही.